मिळालेल्या माहितीनुसार, कमळाबाई आवळे यांना चार मुले असून त्या एक सून अन् मुलीसोबत राहायच्या. शाम संजय आवळे हा त्यांचा २८ वर्षाचा नातू. शामच्या वडिलांना वडिलोपार्जित दोन एकर शेती. त्यावर संसाराचा गाडा कसा ओढायचा म्हणून संजय आवळे दुसऱ्याची शेती खंडाने करतात. शाम त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याने चांगले शिकावे आणि नोकरीला लागावे अशी त्यांची इच्छा होती. पण, शामचं मन शिक्षणात रमेना,त्याने चौथीपर्यंतच शिक्षण घेतले. तो उदगीरला आडतीवर काम करू लागला. त्याला दारूचे व्यसन लागले. शाम सतत मद्यपान करायचा अन् कुटुंबीयांसोबत वाद घालायचा.
दरम्यान, कमळाबाई यांची विवाहित मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली होती. त्यामुळे संजय आवळे अन् कमळाबाई त्यांच्या दोन मुली अन् सून गुजगोष्टी करत बसले होते. शाम तिथे मद्यपान करून आला. त्याने वडीलांच्या खिशातून दोन दिवसापूर्वी ५ हजार रुपये काढून घेतले होते. त्या पैशांचं काय केलं म्हणून वडील संजय आवळे यांनी शामला जाब विचारला. त्यावरून दोघांत कुरबुर वाढली. बाप-लेकातील वाद हाणामारीपर्यंत गेला. त्यामुळे कमळाबाई मध्ये पडल्या आणि भांडण सोडवू लागल्या.
काही काम करत नाही, सारखी दारू पितो , बापालाच भांडतो हाणामारी करतो तुला हे शोभत नाही असं नातुला म्हणाल्या. आता तुझं लग्नाचं वय झालंय कोण पोरगी देईल तुला असं करायलास तर,” असं समजावून सांगत कमळाबाई यांनी शामला हाताला धरून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. पण मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या शामने आजीला ढकलून देत, ” गपय म्हातारे तू काय लावलीस ग” म्हणत बाजूला पडलेला लाकडी दंडुका तिच्या डोक्यात घातला.
दंडुक्याचा मार इतक्या जोरात लागला की कमळाबाई बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, आरोपी नातू घटनास्थळावरून पळून गेला होता. शवविच्छेदनंतर कमळाबाई आवळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह बनशेळकी येथे आणण्यात आला. तेव्हा मात्र आरोपी नातू धाय मोकलून रडू लागला. ‘ये माय तू कुठ निघालीस माझ्यावर रागावून, मला आता जेवायला कोण दिल, माझा लाड कोण करल, उठ ग माय”, म्हणून तो आजीच्या पार्थिवाला अर्जव करू लागला.
मात्र, आजी उठत नसल्याचे पाहून तो पुन्हा गोंधळ घालू लागला. चुलता संग्राम आवळे यांच्या दुकानावर दगडं मारू लागला. हा प्रकार मध्यरात्री सुरू होता अशी माहिती शामचा चुलता संग्राम आवळे यांनी दिली. या प्रकरणी कमळाबाई यांची मुलगी लक्ष्मीबाई महादेव रोडगे यांनी रात्री दोन वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पळून गेलेल्या आरोपी नातूला पोलिसांनी सकाळी नऊ वाजता अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार करत आहेत.