या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला असून या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र, मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे, त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या शंभर फुटी नजीकच्या घराबाहेर बसले असता, अज्ञात दोन ते तीन हल्लेखोर बुलेट गाडीवरून आले. यावेळी त्यांनी मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले, तसेच धारधार शस्त्रांनी वार केले.
य हल्ल्यात मुल्ला हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेनंतर मृत मुल्ला यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली आहे, हे आद्यप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नालसाब मुल्ला यांचा “बाबा” नावाने ग्रुप आहे. ज्याच्या माध्यमातून नालसाब मुल्ला यांची कारकीर्द सुरू झाली होती. बाबा ग्रुपच्या माध्यमातून त्यांची काही वर्षांपूर्वी सांगली शहरात दहशत होती. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले होते. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांचे ते कट्टर कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रिय होते. बांधकाम मटेरिअल विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.