निष्काळजीपणे वेगात बस चालवून ओव्हरटेक करत असताना धक्का लागून हा अपघात घडला आहे. नानासाहेब रामचंद्र घनवट (वय ५८, रा. पवई माळ पणदरे, ता. बारामती जि. पुणे) असं अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी बस चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगवी (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण- बारामती रस्त्यावर हॉटेल निरा गार्डनजवळ नानासाहेब रामचंद्र घनवट हे दुचाकी क्र. एमएच ४२ डी २१५३ वरुन फलटणहून बारामतीकडे निघाले होते. त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटीने क्र. एमएच १४ बीटी ३५०५ दुचाकीला ओव्हरटेक करताना जोराची धडक दिली. या धडकेत घनवट हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
निष्काळजीपणाने गाडी चालवून घनवट यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक रुपेश गंगाराम तोडकर (रा. नवगिरे वस्ती दौंड, ता. दौंड) यांच्याविरुद्ध नानासाहेब यांचे भाऊ संपत रामचंद्र घनवट यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत. दरम्यान, ओव्हरटेक करण्याच्या नादात चालक भान विसरून गाड्या चालवताना दिसतात, त्याला कुठे तरी आळा घातला पाहिजे. तसेच चालकांच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे रस्ते वाहतूक नियम अधिक कडक करण्याची गरज आहे.