• Sat. Sep 21st, 2024

लग्नाच्या आठव्या दिवशी बायको माहेरी, फोनवर उडवीउडवी, सत्य समजताच नवरदेव हादरला

लग्नाच्या आठव्या दिवशी बायको माहेरी, फोनवर उडवीउडवी, सत्य समजताच नवरदेव हादरला

सातारा : विवाह म्हणजे सामाजिक बांधिलकी, विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन, विवाह म्हणजे विश्वास, नातेसंबंध जपणारी व जोडणारी आपली संस्कृती. पण याला हल्लीच्या काळात बट्टा लावण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. पैशाच्या हव्यासापोटी विवाह लावून देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जात आहे. विवाह इच्छुक युवकांसह त्यांच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांना गंडा घातला जात असल्याचे दिसत आहे. इच्छुक वराला मुलगी दाखविण्यापासून ते अक्षता टाकण्यापर्यंतचे सगळेच कार्यक्रम आता फिल्मी स्टाईल व बनावट पद्धतीने उरकले जात आहेत. असाच अनुभव सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील दोन युवकांना आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विवाहासाठी दोन युवकांकडून सव्वाचार लाख रुपये घेतल्यानंतर बोगस विवाह लावून देऊन संबंधित युवकांची फसवणूक केली. या प्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

रमेश तानाजी नांगरे (रा. शेखरवाडी, ता. वाळवा) या युवकाने दिलेल्या फियादीवरून वर्षा जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर, जि. सांगली), शंकर थोरात (रा. वसंतगड, ता. कराड), पूजा ऊर्फ स्नेहल पाटील व पूजा यादव (दोघीही रा. इचलकरंजी जवाहरनगर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.

वसंतगड येथील शंकर थोरात हा विवाह ठरवतो, अशी माहिती शेखरवाडीतील रमेश नांगरे या युवकाला मिळाली होती. त्यानुसार शेखर व त्याच्या चुलत्यांनी वसंतगडमध्ये शंकर थोरात व वर्षा जाधव या दोघांची भेट घेतली. त्यावेळी दोघांनी विवाह ठरविण्यासाठी रमेश नांगरे याच्याकडून २ लाख २५ हजार रुपये घेतले.

मधुचंद्राला बायकोचा नकार, नाशिकच्या नवरदेवाने खडसावतच म्हणाली, दोनदा लग्न झालंय, तुमचे…
१५ एप्रिल रोजी पूजा पाटील या मुलीला दाखविले. मुलगी पसंद असल्याचे सांगितल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पलाश हॉलमध्ये त्या दोघांचा विवाह लावून दिला. विवाहानंतर पूजा शेखरवाडीत होती. आठव्या दिवशी पूजेसाठी पूजा हिची आई, मावशी, मावस बहीण आणि दाजी शेखरवाडीला आले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा शेखरवाडीला येऊन पूजाला काही दिवसांसाठी माहेरी इचलकरंजीला नेतो, असे सांगून पूजाला घेऊन गेले.

केटरिंगच्या कामाचं आमिष दाखवलं, मुलीचं बळजबरीनं लग्न लावलं; नाशिकमध्ये खळबळ

दरम्यान, दोनच दिवसांनी विश्रामबाग सांगली पोलिस ठाण्यात वर्षा जाधव, शंकर थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती रमेश नांगरे याला मिळाली. त्यामुळे संशय आल्याने त्याने पूजा यादव हिच्या मोबाइलवर फोन करून पत्नी पूजा पाटील हिला सासरी कधी पाठवणार, अशी विचारणा केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पत्नी पूजा सासरी न आल्यामुळे फसवणूक झाल्याचे रमेश नांगरे याच्या लक्षात आले. त्यानुसार त्याने कराड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

बाईकला धडकून कार खिंडीतून खाली कोसळली, नवविवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
येणके येथील युवकाचीही या टोळीने फसवणूक केली. टोळीने दोन लाख रुपये घेऊन १५ डिसेंबर २०२२ रोजी येणकेतील युवकाचा साक्षी साळुंखे या युवतीशी विवाह लावून दिला. विवाहानंतर २५ ते ३० दिवस साक्षी येणके येथे राहिली. मात्र, आजारी बहिणीला इंदापूर येथून भेटून येते, असे सांगून साक्षी गेली, ती परत आलीच नाही. त्यामुळे युवकाचीही दोन लाखांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात बोगस विवाहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed