शंभर शिशू कोणत्याही क्षणी दाखल
घाटीत दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. कोणत्याही क्षणी घाटीच्या एनआयसीयू व बालरोग विभागात शंभर नवजात शिशू दाखल असतात. मात्र जागेअभावी अनेक गरोदर व बाळंत महिलांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात, तर ‘एनआयसीयू’च्या एका बेडवर दोन-दोन, तीन-तीन शिशुंवर उपचार करण्याची वेळ येते. मात्र एमसीएच विंग ही घाटीत झाली तर सर्वच रुग्णांवर उपचार-शस्त्रक्रियांसाठी प्रशस्त जागा मिळेल. पुन्हा जागेची अडचण हा विषय बाद होऊन रुग्णांच्या नातेवाईकांना घाटीच्या अरुंद जागेत ताटकळत उभे राहण्याची गरज राहणार नाही. मुळात घाटीत निष्णात डॉक्टरांची व निवासी डॉक्टरांची फळी आहेच; केवळ परिचारिका व सफाई कर्मचारी अधिक प्रमाणात लागतील, असेही डॉ. गडप्पा यांच्यासह नवजात शिशुशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
‘अंडर वन रुफ’ अनेकार्थांनी उपयुक्त
प्रसूतीपूर्वी, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात माता व नवजात शिशुंना अगदी सर्व प्रकारच्या सेवा व सुविधा एकाच छताखाली मिळणे अतिशय महत्वाचे आहे आणि हीच जगमान्य संकल्पना आहे. त्यामुळे गरोदर मातेला सर्व प्रकारचे उपचार मिळाले पाहिजेच; शिवाय तिला तिच्या शिशुला गरजेनुसार ‘केएमसी’ देता आली पाहिजे व शिशुलाही गरजेनुसार ‘एनआयसीयू’च्या सेवा मिळाल्या पाहिजे. त्याशिवाय जन्मजात व्यंग, विकार व व्याधींवर दीर्घकालीन उपचार व पाठपुरावा करण्यासाठी ‘डीईआयसी’ केंद्रही याच एका छताखाली असणे अपेक्षित आहे. त्याहीपुढे जाऊन ‘फिटल मेडिसिन’च्या सेवाही गरजेनुसार याच एका छताखाली उपलब्ध असणे अपेक्षित आहे. अर्थात, या सर्व अद्ययावत सेवा-सुविधा एकाच दमात सरकारी यंत्रणेत उपलब्ध होतील, अशी अपेक्षा करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने या सुविधा उपलब्ध होऊ शकतील आणि त्याची सुरुवात ‘एमसीएच विंग’पासून होऊ शकते. दरम्यान, केएमसी वॉर्ड व ‘मिल्क बँक’ या सेवा घाटीच्या नवजात शिशुशास्त्र विभागांतर्गत सुरू होत आहेच आणि या अनुषंगाने ही विंग घाटीत सुरू झाली तर गरोदर मातेसह शिशुंच्या अनेक महत्वपूर्ण सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
एमसीएच विंगला घाटीसारखी संस्थाच खऱ्याअर्थाने न्याय देऊ शकते, कौशल्यपूर्ण रुग्णसेवा देऊ शकते आणि खरे म्हणजे अशी विंग ही घाटीची फार मोठी व महत्वाची गरज झाली आहे. त्यामुळेच या विंगचा प्रस्ताव पुढील आठवड्यात वैद्यकीय शिक्षण विभागाला देण्यात येणार आहे. -डॉ. संजय राठोड, अधिष्ठाता, घाटी
घाटीत यापूर्वी एमसीएच विंग उभी करण्याचा निर्णय झाला होता आणि विंगच्या इमारतीचा नकाशा, आराखडा व इतर बाबीदेखील सज्ज झाल्या होत्या. आता ही विंग उभी करण्याचा निर्णय झाला तर नकाशा व आराखड्याचा उपयोग होऊ शकतो. या विंगच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधांमुळे अधिकाधिक व्यापक व गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा देणे शक्य होऊ शकेल. -डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग विभागप्रमुख, घाटी
एमसीएच विंगच्या माध्यमातून एकाच छताखाली ८० खाटांचे ‘एनआयसीयू’, ४० खाटांचा केएमसी वॉर्ड व १० खाटांचे ‘एमएनसीयू’ उपलब्ध होऊ शकते. असेच नियोजन पूर्वी करण्यात आले होते. त्यामुळे अशी विंग ही गरोदर माता व नवजात शिशुंसाठी सर्वस्तरीय व्यापक रुग्णसेवेचे केंद्र होऊ शकते. -डॉ. एल. एस. देशमुख, नवजात शिशुशास्त्र विभागप्रमुख, घाटी