• Wed. Nov 27th, 2024

    कोतवाल भरती ‘व्यवहारा’ची ऑडिओ क्लिप व्हायरल; प्रशासनात खळबळ, नव्याने होणार भरती?

    कोतवाल भरती ‘व्यवहारा’ची ऑडिओ क्लिप व्हायरल; प्रशासनात खळबळ, नव्याने होणार भरती?

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : कोतवाल भरतीत नियुक्ती मिळवून देण्यासाठी एका एजंटने उमेदवाराच्या पतीला फोनवर पैशांची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तुमसर तालुक्यातील हा प्रकार उघड होताच कोतवाल भरती नव्याने घेण्याची मागणी जोर धरत आहे. भंडारा तालुक्यात कोतवाल भरतीप्रकरणात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच या ऑडियो क्लिपने प्रशासनात खळबळ उडाली आहे.तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील विपूल दहाट यांना कोतवाल भरती परीक्षेसंदर्भात एका अज्ञात एजंटने फोन केला. दहाट यांच्या पत्नीने कोतवाल भरती परीक्षा दिल्याची माहिती या एजंटने काढली. दहाट यांच्या गावातीलच अमित ढोमणे नामक व्यक्तीच्या मोबाइलवरून दहाट यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर निकालाच्या दिवशी या एजंटने दहाट यांना पुन्हा फोन केला आणि ‘गजभियेबाई तुमच्या पुढे आहे, पण निकाल लागायला वेळ आहे. त्यामुळे तुम्ही म्हणत असाल तर तुमचे नाव पुढे करता येईल,’ असे सांगितले. ‘आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आहेत. त्यामुळे निकाल जाहीर करायला वेळ लागेल. अजूनही वेळ आहे. तुम्ही म्हणत असाल तर तुमचे नाव पुढे करतो. अमितकडे तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट द्या फक्त, बाकी निकाल लागल्यावर बघू. लवकर सांगा’ असेही तो एजंट म्हणत होता. त्यावर दहाट यांनी ‘माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, नंतर बघू’ असे सांगितले.

    या एजंटचा म्होरक्या कोण आणि आतापर्यंत किती जणांकडून याने पैसे घेऊन नियुक्ती केली, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याबाबत एआयएसएफचे राज्य सचिव वैभव चोपकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांना भेटून ही ध्वनीफीत ऐकविली असता सदर अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचे वैभव यांनी सांगितले. कोतवाल भरती तसेच पोलिस पाटील भरती परीक्षा आणि नियुक्ती यात संपूर्ण जिल्ह्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत विविध मागण्यांचे निवेदन चोपकर यांनी जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी तुमसर यांच्याकडे दिले आहे.
    धक्कादायक! प्रेयसीने कोर्टात केलं लग्न, नंतर हनिमूनला गेली आणि कापून टाकला पतीचा प्रायव्हेट पार्ट
    ‘भरती प्रक्रिया नव्याने राबवा’

    कोतवाल भरती प्रक्रियेत घोळ झाल्याने ही प्रक्रिया नव्याने घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. या शिष्टमंडळात असित बागडे, बालू ठवकर, प्रमोद केसलकर, राधे भोंगाडे, डॉ. देवानंद गवळी, नयना लांजेवार, स्वप्नील अहिरकर, विनोद लांजेवार, हंसराज गजभिये, पराग वगरे, परमेश वलवे उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed