साहेब बाबूचा मित्र मोहम्मद इंजमाम उल मोहम्मद गुलजार हक (२३, रा. कॉलेजरोड, मूळ बिहार) याने पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित केशव शिंदे याला ताब्यात घेतले असून, त्याच्यासह एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील परतैली येथील रहिवासी साहेब बाबू कॉलेजरोड परिसरात कामानिमित्त वास्तव्यास होता. मंगळवारी (दि. ६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास केशव आणि साथीदाराने त्याला बोलावले. त्यानुसार मित्र इंजमाम उलसोबत तो सीतागुंफा चौकात गेला होता. यावेळी साहेब बाबू व इंजमाम उलसोबत दोघांचा वाद झाल्याने केशव व त्याच्या मित्राने लाकडी दांडक्याने हल्ला केला. यात साहेब बाबू गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, सहायक निरीक्षक मिथुन परदेशी यांचे पथक पोहोचले. त्यांनी साहेब बाबूला आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचारांदरम्यान, बुधवारी (दि. ७) सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (दि. ८) दुपारपर्यंत केशवला पोलिसांनी ताब्यात घेतले. पंचवटी पोलिस खुनाच्या कारणाचा शोध घेत आहेत.
खुनामागे वैयक्तिक कारण?
साहेब बाबू याचे संशयितांपैकी एकाशी वैयक्तिक कारणातून खटके उडाले होते. एका खासगी कारणातून त्यांच्यातील वाद वाढला. संशयितांनी समजावूनही साहेब बाबू ऐकत नव्हता. त्यामुळे संशयितांनी त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी खरबदारी म्हणून सर्व बाजूंनी तपासाची सूत्रे फिरवली आहेत.