• Sat. Sep 21st, 2024

Nashik News : जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे २१८ कोटींची थकबाकी; महावितरणची वीजतोडणी मोहीम सुरू

Nashik News : जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे २१८ कोटींची थकबाकी; महावितरणची वीजतोडणी मोहीम सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील बहुतांश भागाला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणची ग्राहकांकडील थकबाकी नाशिक जिल्ह्यात २१८ कोटी रुपये आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक थकबाकी कृषी क्षेत्राची असली तरी घरगुती ग्राहक, वाणिज्यिक, कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या थकबाकीचा आकडाही मोठा आहे.वीजबिलांची थकबाकी असलेल्यांविरुद्ध महावितरणने वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे. एका महिन्याची थकबाकी असली तरी मीटर कापले जात आहे. तरीही अनेक ग्राहक बिल भरत नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वीजसेवा देणारी महावितरण कंपनी ही स्वतः एक ग्राहक आहे. महावितरणकडून ‘महानिर्मिती’ तसेच इतर खासगी वीज कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. ही वीज उपकेंद्रांपर्यंत आणण्यासाठी महापारेषणला वहन आकारही द्यावा लागतो. तसेच वसूल केलेल्या वीजबिलांमधील सुमारे ८० ते ८५ टक्के रक्कम ही वीजखरेदी, पारेषण खर्च आदींवर खर्च होते. याचबरोबर महावितरणला कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन, खर्च, विविध कर, दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचे कामे आणि व्याजासह कर्जांचे हप्ते अशी दरमहा देणी द्यावी लागतात. अशावेळी थकबाकी वसुलीने हा भार हलका होत असतो.

– नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिमंडळात सर्वात जास्त थकबाकी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे, त्या खालोखाल घरगुती ग्राहक

– नाशिक मंडळात स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदीप व पाणीपुरवठ्यासाठी असलेली थकबाकी सर्वात जास्त

– यामध्ये घरगुती ग्राहकांकडेदेखील मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, याची वसुली अत्यंत धिम्या गतीने सुरू

– अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेकडील थकबाकी वसूल होत नसल्याने अडचणींमध्ये वाढ

मालेगाव मंडळ

७५ हजार ९०२

ग्राहक

७४ कोटी ४४ लाख

थकबाकी

नाशिक मंडळ

२ लाख ५६ हजार ९८३

ग्राहक

१४३ कोटी ४० लाख

थकबाकी

सातत्याने वसुलीसाठी महावितरणचे प्रयत्न सुरू असतात. याचबरोबर ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी आवाहन केले जाते. मात्र, बिल न भरल्यास तातडीने वीजप्रवाह खंडित केला जात असल्याने ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे.

– विकास आढे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed