• Mon. Nov 25th, 2024

    ताडोब्यात कुरण विकासाला गती; वन्यजीवांच्या सोयीसाठी प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा देखील समावेश होणार

    ताडोब्यात कुरण विकासाला गती; वन्यजीवांच्या सोयीसाठी प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा देखील समावेश होणार

    म. टा. प्रतिनिधी चंद्रपूर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कुरण विकास व व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात असून त्या कामाला गती आलेली आहे. त्या प्रकल्पांतर्गत खाद्य गवत प्रजातीची घनता वाढवून वन्यजीवांचा अधिवास विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. परिणामी तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे वाघांच्या संख्येत स्वाभाविकच वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येथील व्याघ्रसंख्या स्थिर असल्याचे दिसून आले आहे.राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री व ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प असून त्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प राज्यातील प्रमुख प्रकल्प मानला जातो. राज्यात सर्वाधिक वाघ याच प्रकल्पात आहेत. देशात ताडोबा हे एक सर्वात उत्तम प्रजनन केंद्रांपैकी एक म्हणजे वाघांचे ‘मॅटिर्निटी होम’ मानले जाते. ताडोब्याच्या जंगलात ८५ विविध प्रकारच्या गवत प्रजाती आढळतात. त्यात ६२ गवत प्रजाती या तृणभक्षी वन्यप्राण्यांसाठी खाद्य आहेत. इतर अखाद्य गवती प्रजाती आहेत. रानमुख, रानतुर, रान सोयाबीन यासह ९ प्रकारच्या शेंगवर्गीय वनस्पती येथे आढळतात. २०११ पासून ताडोबात ‘कुरण विकास प्रकल्प’ राबविला जात आहे. या अंतर्गत मातीचे निरीक्षण व परीक्षण, मातीनुसार गावात प्रजातींची निवड, ताडोबातील प्रमुख प्रजातींची ओळख, गवत प्रजातींचे बीज संकलन करणे अशी कामे केली गेली.

    भूत, गांजा, बला, तरोटा अशा खराब, निरुपद्रवी अखाद्य वनस्पतींचे निर्मूलन व उच्चाटन केल्यावर त्या वनस्पतीचे परिस्थितीनिहाय पुनर्निर्माण केले गेले. पण खरे काम हे मागील ३ वर्षांपासून येथे झाल्याचे दिसून येत आहे. ताडोबाच्या कोर झोनमधील पळसगाव, जामनी, नवेगाव सारख्या गावांचे पुनर्वसन झाल्यावर तेथे गवताचे कुरण विकसित केले गेले. चितळ, सांबर, गवा सारख्या तृणभक्षी वन्यजीवांचा वावर जास्त आहे, तेथे संरक्षण दिले गेले. या गावातील गावठाण क्षेत्रातील अखाद्य वनस्पती काढल्या गेली. पळसगाव येथील गावठाण क्षेत्रातील चार हेक्टरमध्ये व इतर भागात नैसर्गिकरीत्या कुरण विकसित केले गेले.

    Cyclone Biporjoy: अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ, मान्सूनचं काय होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
    तीन वर्षांपूर्वी या भागात सुमारे २५ ते ३० चितळ दिसत होते. आता तेथे सुमारे ६०० ते ७०० चितळांचा कळप दृष्टीस पडत असल्याचे चिखलदरा येथील ज्येष्ठ गवत तज्ज्ञ गजानन मुरटकर यांनी सांगितले. सदर प्रकल्प ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या पुढाकारात राबविला जात आहे. आता आहे त्या गवत वनस्पतीत तृणभक्षी वन्यप्राण्यांना आवडणाऱ्या गवत प्रजातीची घनता वाढविणे, मातीची सुपीकता वाढवण्यासाठी बीज शेंगवर्गीय वनस्पतींचे बीज रोवणे आणि वन्यजीवांचा अधिवास विकसित करण्याच्या दृष्टीने कुरण विकासाचे कार्य केले जाणार असल्याची माहिती उपसंचालक नंदकिशोर काळे व साहाय्यक उपसंचालक महेश खोरे यांनी दिली.

    प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक गाड्या

    ताडोब्यात वन्यजीवांचा त्रास व प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न आहे. प्रायोगिक तत्वावर सदर काम केले जाईल. यासाठी जिप्सी चालक व मालक यांच्या आर्थिक बाजूचा विचार करून पुढील पावले उचलली जाणार असल्याचे संकेत आहेत.

    – पळसगाव परिसरात चितळांचा असा कळप दिसतो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed