महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांना देशभरातून लाखो पर्यटक भेट देत असतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असून, पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यातच या भागातील विशेषत: पाचगणी येथील रस्ते अरुंद आहेत. त्यातच रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन पार्किंग मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. त्यावर उपाय म्हणून वाहतुकीत बदल करण्यात येत आहे. हा बदल नऊ ते २५ जून या कालावधीत लागू केला जाणार आहे. या बदलाबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नियमित रस्त्याचा वापर केल्यास…
वाहतूक बदलाच्या दिवशी अनेक पर्यटक महाबळेश्वर, पाचगणी येथून नियमित रस्त्याचा वापर करून पुण्याकडे येण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांना लिंगमळा-भेकवलीमार्गे मेढा रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे.
अशी असेल वाहतूक व्यवस्था
– पुण्याकडून महाबळेश्वरला जाण्यासाठी सुरुर फाटा-वाई-पाचगी-महाबळेश्वरला जाता येईल.
– पाचगणीकडून पुण्याला येण्यासाठी पाचगणी-संजिवनी विद्यालय-रुईघर-महू डॅम रस्ता-कोळेवाडी-कुडाळ-पाचवड फाटामार्गे यावे लागेल.
– महाबळेश्वरकडून पुण्याला येण्यासाठी मेढा-कुडाळ-पाचवड फाटा मार्गे यावे लागेल.
– कोल्हापूर, साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांना मेढा घाटमार्गे यावे लागेल.
– स्थानिक नागरिकांना या वाहतूक बदलातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या वाढलेली असते. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होत असतात. प्रशासनानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर नवा बदल लागू करण्यात आला आहे. याला किती यश येतं हे पाहावं लागणार आहे.