पाटील यांच्या सोशल मीडिया पेजवर शिंदे गटाच्या खासदारावर थेट खोकेबहाद्दर आणि गद्दारीची शिक्का मारण्यात आल्याने भाजप विरुद्ध शिवसेनेत आता वादाची ठिणगी पडली आहे. भाजपने गोडसेंच्या मतदारसंघात संयोजक नियुक्त केल्याने शिंदे गटात अस्वस्थता असतानाच पाटील यांच्या सोशल मीडियावरील टीकेने दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका वर्षभराने असल्या, तरी या निवडणुकांसाठीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी वेगवेगळ्या मार्गाने शक्तिप्रदर्शन करीत आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठीदेखील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे सध्या लोकसभेचे प्रतिनिधीत्व करीत असले, तरी या लोकसभा मतदारसंघावर भाजपचादेखील डोळा आहे. भाजपने गेल्याच आठवड्यात नाशिक लोकसभेसाठी आमदार देवयानी फरांदे यांची संयोजक म्हणून नियुक्ती केली होती. त्यावरून शिंदे गटात अस्वस्थता असतानाच आता ‘दिनकर पाटील फॅन क्लब’ या सोशल मीडिया पेजवर थेट गोडसे यांचा गद्दार आणि खोकेबहाद्दर असा नाव न घेता उल्लेख करण्यात आल्याने भाजप-शिंदे गटात मिठाचा खडा पडला आहे. सोमवारी पाटील यांच्या समर्थकांनी गोडसे यांच्यावर खोकेबहाद्दर व गद्दार असे आरोप करणारी विडंबनात्मक कविता सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात खळबळ उडाली. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून पाटील यांच्या समर्थकांच्या पोस्टला काय उत्तर दिले जाते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
गोडसे समर्थकांत चलबिचल
पाटील भाजपकडून लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठीची तयारीही त्यांनी सुरू केलेली आहे. या उमेदवारीसाठी त्यांनी सध्या भाजपच्या नेत्यांकडे लॉबिंगही सुरू केले आहे. नुकतेच एका शाळेच्या उद्घाटनानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे पाटील यांना बळ देण्याचे सूतोवाच केल्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळेल व पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जाऊ लागली. त्यामुळे पाटील यांचे समर्थकही आता आक्रमक झाले आहेत. पाटील यांचा या मतदारसंघातील जनसंपर्क पाहता भाजपकडून त्यांच्या नावाचाही विचार केला जात असल्याने गोडसेंच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
‘दिनकर पाटील फॅन क्लब’ नावाने खासदार गोडसे यांची गद्दार व खोकेबहाद्दर अशी संभावनी करणारी पोस्ट काही उत्साही कार्यकर्त्यांकडून व्हायरल झाली. त्या पोस्टशी माझा कोणताही संबंध नाही. उत्साही कार्यकर्त्यांकडून हा प्रकार घडला असावा.
-दिनकर पाटील, माजी सभागृह नेते, भाजप
शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून हेमंत गोडसे स्वार्थासाठी बाहेर पडलेत. खोक्यांसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दगा दिला. त्या आरोपांना भाजपचे पदाधिकारी दिनकर पाटील यांनी पुष्टी दिलेली आहे. खरे बोलल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्यांचे अभिनंदन!
-सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना, ठाकरे गट