या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३३ समित्यांचे गठन केले असून त्या माध्यमातून गेले दोन महिने या सोहळ्याचे नियोजन सुरू आहे. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी गडाच्या पायथ्याशी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करता येणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर काळा हौद येथे दीड लाख लिटर, कोहीम तलाव येथे दीड लाख लिटर, हनुमान टाकी येथे एक लाख लिटर, गंगासागर येथे दीड लाख लिटर, श्रीगोंडा येथे एक लाख लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ वैद्यकीय पथके सर्व आरोग्य सोयीसुविधांसाह तैनात करण्यात आली आहेत. तसेच, गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध आहेत.
हृदयविकार, मधुमेह आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी गडावर येणे टाळावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच गडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून जवळपास दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गडावर वैशिष्ट्यपूर्ण आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्वराज्याची राजधानी उजळून निघाली आहे.
पिण्याच्या पाण्याची सोय, अन्नछत्र
पायरी मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्तासाठी अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची बाटली तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी मर्दानी खेळ, शाहिरी अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गडावर जाण्यासाठी सरसकट रोप-वे तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली आहे. गडावर असलेल्या पाणीटंचाईमुळे रोप-वेचा वापर फक्त पाणी वाहतुकीसाठी व शासकीय वापरासाठी करण्यात येत आहे.