वाघांसाठी प्रसिध्द ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देशविदेशातील पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यासोबत पर्यटकांच्या फसवणूकीच्या घटनाही एका मागून एक समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑनलाईन बुकींगच्या नावावर पर्यटकांच्या फसवणूकीचे प्रकरण समोर आले होते. आता माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचे सुपूत्र पंकज गावंडे तसेच मित्र प्रविण जगन्नाथ कुचर, अभिजीत नंदकिशोर मुळे, प्रविण अनंतराव सावळे आणि कुणाल पंजाबराव काळे या पाच मित्रांची एजंट अमृत नाईक याने ४० हजार रूपयांची फसवणूक केली आहे.
पर्यटक पंकज गावंडे २९ व ३० मे रोजी ताडोबात पर्यटनासाठी आले होते. ताडोबा कोर सफारीसाठी एजंट अमृत नाईक यांच्याकडून बुकींग करण्यात आले होते. यासाठी नाईक यांच्या गुगल पे च्या खात्यात २० हजार, १२ हजार व एक हजार आणि रोख सात हजार रूपये असे एकूण ४० हजार रूपये देण्यात आले.
विशेष म्हणजे या ४० हजार रूपये शुल्काची पावती नाईक यांनी पर्यटकांना दिली नाही. ४० हजार रूपयांमध्ये कोलारा गेटमधून ताडोबा कोरमध्ये दोन जंगल सफारीचे ठरविण्यात आले होते. मात्र नाईक यांनी या पाचही पर्यटकांना ताडोबा प्रकल्पात कोलारा गेट पासून ४ किलोमीटर दूर अंतरावरील निमढेला गेट येथे आणून सोडले. तिथे चौकशी केली असता ही कोर सफारी नसून, बफर सफारी आहे. इथे आम्हाला कोणत्याही प्रकारची पावती दिली नाही, तसेच ठरल्याप्रमाणे एजंटने दुसऱ्या दिवशी कोर सफारीऐवजी बेलारा प्रवेशव्दारातून पुन्हा बफर सफारी घडवून आणली. तिथेसुध्दा गेट पास किंवा बफर सफारीची कुठल्याही प्रकारची पावती दिली गेली नाही.
याबाबत एजंट अमृत नाईक याला विचारले असता आम्हाला ताडोबाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांभाळावे लागते, असे उत्तर दिले. त्यानंतर उपवनसंरक्षक नंदकुमार काळे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. तुम्हाला जे काही विचारायचे आहे तुम्ही त्यांनाच विचारा असे म्हटले. आम्हाला ताडोबाच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करावे लागते तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशी धमकी दिली. ताडोबातील एजंटकडून झालेल्या फसवणुकीची लेखी तक्रार पंकज गावंडे आणि मित्रांनी ताडोबाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान या तक्रारीची गंभीर दखल ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. रामगावकर यांनी घेतली आहे.
थेट पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याकडे तक्रार करून उमरेड येथे वास्तव्याला असलेला एजंट अमृत नाईक याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. ताडोबा प्रकल्पात कोर विभागात जंगल सफारीची बुकींग ऑनलाईन पध्दतीने होते. वेळेवर होणारी बुकींग व्यवस्थापन कोट्यातून क्षेत्र संचालक कार्यालयातून होते. इतकी अधिकची रक्कम घेवून पर्यटकांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची बदनामी झाली आहे.
एजंट अमृत नाईक याच्याविरूद्ध पर्यटकांची फसवणूक करून ताडोबा आणि प्रकल्पातील अधिकाऱ्यांची जनमाणसात प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी तथा शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचा दुरूपयोग केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे पोलीस अधीक्षक परदेशी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.