• Tue. Nov 26th, 2024

    पर्यटन, कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Jun 1, 2023
    पर्यटन, कृषी क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि‌. १ :- जपान आणि महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील सहकार्य भारत -जपान सौहार्द संबंध आणखी दृढ करतील. त्यादृष्टीने जपानचे पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योग यांचे स्वागतच असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

    जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी यांच्या समवेतच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीप्रसंगी जपानच्या भारतातील दूतावास मंत्री श्रीमती हुकुगो क्योको, श्रीमती होम्मा मायू, दूतावास सचिव उसामी कोईची, मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख फुकाहोरी यासुकाटा, राजकीय सल्लागार विवेक कुलकर्णी तसेच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

    या चर्चेत मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, भारत आणि जपानचे पूर्वापार चांगले संबंध आहेत. त्यातून दोन्ही देशाची अनेक क्षेत्रात उत्तम भागीदारी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे. महाराष्ट्राकडे उद्योग आणि गुतंवणुकीची दृष्टीने मोठी क्षमता आहे. राज्यातील विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पाठबळ मिळत असते. बुलेट ट्रेन प्रकल्पाही आम्ही आता त्याच वेगाने गतीमान केले आहे. जपानकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. तर आमच्याकडे कुशल असे मनुष्यबळ आहे. त्यामुळे आपण एकत्र आलो तर खूप मोठा बदल घडवू शकतो. हे एमटीएचएल या भारतातील सर्वात लांबींच्या समुद्री सेतुचे उभारणीतून आपण दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील विविध औद्योगीक वसाहती आणि प्रकल्पांमध्ये जपानचे सहकार्य महत्वपूर्ण ठरू शकते. अशाच सहकार्यातून आपण मुंबई हे शहराला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

    महाराष्ट्रातील पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणूक व उद्योग संधीसाठी जपानचे स्वागतच असेल असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अजंठा लेणी परिसरात बुद्धीस्ट सर्कीट संकल्पनेतून पर्यटन सुविधा उभारल्याचेही माहिती दिली. तसेच राज्यातील विधिमंडळ सदस्यांनी नुकतीच जपानला भेट देऊन विविध क्षेत्रांची उपयुक्त माहिती घेतल्याचे सांगितले.


    यावेळी चर्चेत जपानचे राजदूत श्री. हिरोशी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा ‘स्ट्रांग लीडरशीप’ असा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, मुंबई विषयी आमच्याकडे मोठे कुतुहल आहे. महाराष्ट्रातही आम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठ्या संधी दृष्टीपथात आहेत. विशेषतः पर्यटन, वैद्यकीय क्षेत्र आणि कृषी या क्षेत्रातील आपल्याला एकत्र काम करता येईल. मुंबई आणि योकोहामा या शहराचे दृढ संबंध आहेत. सिस्टर सिटीज् म्हणून या दोन्ही शहरांमध्ये अदानप्रदानही सुरु आहे. या दोन्ही शहरांच्या विकासासाठी आम्हाला विविध संकल्पना राबवण्यात रस आहे. जपान-भारत संबंध आणि मुंबई-योकोहामा या दोन शहरांचे बंध दृढ व्हावेत यासाठी इन्डो-जपान सोसायटीच्यावतीने आगामी काळात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. एमटीएचएल हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प मुंबईचा कायापालट करणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

    यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. कांबळे यांनीही दिल्ली-मुंबई कॉरिडॉर तसेच त्यावर विकसित करण्यात येणाऱ्या औद्योगिक नगरींची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य सचिव श्री. गगराणी, श्रीमती म्हैसकर-पाटणकर, प्रधान सचिव श्री. सिंह यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

    जपानचे वाणिज्यीक दूतावास प्रमुख श्री. यासुकाटा यांनीही जपान आणि ‘जायका’च्या वित्तीय सहाय्यातून सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली.सुरवातीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जपानचे राजदूत श्री. हिरोशी यांचे हिमरू शाल आणि भगवान बुद्धांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले. श्री. हिरोशी यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना जपानी परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र भेट दिले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed