• Sat. Sep 21st, 2024

खाद्यतेल पुन्हा आवाक्यात? मुबलक आयात व साठ्यामुळे दर घसरणीचे संकेत, कशा असतील किंमती?

खाद्यतेल पुन्हा आवाक्यात? मुबलक आयात व साठ्यामुळे दर घसरणीचे संकेत, कशा असतील किंमती?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : खाद्यतेलाचे दर लवकरच दोन वर्षांपूर्वीच्या स्तरावर येण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. मलेशियात पामची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असतानाच भारतात वापर कमी झाला आहे. एकूणच मुबलक आयात व साठ्यामुळे दर घसरणीचे संकेत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहेत.

खाद्यतेलाचे दर करोना संकटकाळात सरासरी १०० ते १२० रुपये प्रतिलिटरदरम्यान होते. त्यानंतर मलेशिया व इंडोनेशियाहून होणाऱ्या पामतेल आयातीत घट झाली. पुढे रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफुल तेलाला फटका बसला. त्यामुळे हे दर वाढत जाऊन २०२२ पर्यंत सरासरी १६० ते १८० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले. आता सध्या ते १४० ते १६० रुपयांदरम्यान आहेत. मात्र पाम व सूर्यफुलाची स्थिती पाहता, या दरांत घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

‘भारतात एकूण तेलापैकी सर्वाधिक वापर पामतेलाचा असतो. हे पामतेल मलेशिया व इंडोनेशियाहून आयात करावे लागते. मागील दीड ते दोन वर्षांपासून आयात महागल्याने पामतेल महाग होऊन त्याचा परिणाम अन्य सर्वच खाद्यतेलांवर झाला होता. आता यंदा मलेशियात पामच्या उत्पादनात नऊ टक्क्यांची मोठी वाढ झाल्याने आयात स्वस्त होणार आहे. त्याचवेळी भारतातही पामतेल वापरात काही प्रमाणात घट झाल्याने आयातीची गरज कमी झाली आहे. दुसरीकडे युक्रनमध्ये सूर्यफुल तेलबियांचे विक्रमी उत्पादन होऊ घातले आहे. युद्धादरम्यान अडकलेला जुना साठा संपविण्यासाठी मिळेल त्या दरात युक्रेनेकडून तेलबियांची निर्यात होत आहे. या सर्व स्थितीत येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होणार असे स्पष्ट संकेत आहेत’, असे अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले.

भारत हा जगातील सर्वाधिक तेल वापरकर्ता देश आहे. भारतात दरवर्षी २.२० कोटी टन खाद्यतेलाचा वापर होतो. एकूण मागणीच्या ७० टक्के तेल आयात केले जाते. त्यामध्ये निम्म्याहून अधिक पामतेल तर आयातीपैकी जवळपास २५ टक्के खाद्यतेल सूर्यफुलाचे असते. हे सूर्यफुल सर्वाधिक युक्रेन, रशिया व अर्जेंटिना येथून आयात केले जाते.
प्रश्न विचारल्यावर मोदींचा ‘मिस्टर इंडिया’; कॉंग्रेस प्रवक्त्या अनुमा आचार्य यांचा खरमरीत टोला
शेंगदाण्याचा थोडा फटका

पाम व सूर्यफुल तेल स्वस्ताईचे संकेत असले तरी शेंगदाणा तेल इतक्यात स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. यंदाच्या रब्बी मोसमानुसार देशात १४.७४ लाख टन शेंगदाणा पीकाची शक्यता असून त्यात मागीलवर्षीपेक्षा २.२६ लाख टनाची घट आहे. तर उन्हाळी पिकातही जवळपास १ लाख टनाची घट आहे. यामुळेच मागीलवर्षी या काळात ६५०० रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता ८ हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. याचा परिणाम देशांतर्गत शेंगदाणा तेलावर होईल, असे खाद्यतेल महासंघाचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed