• Sat. Sep 21st, 2024

निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ByMH LIVE NEWS

May 30, 2023
निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.३० : जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन करून निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्यावतीने स्वच्छ मुख अभियानासाठी सदिच्छादूत सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम आज येथे झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीष महाजन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसंचालक डॉ.अजय चंदनवाले आदींसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, “मौखिक आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शाळेतील मुलांमध्येही तंबाखू, गुटखा, खर्रा अशा पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर रोगाचे प्रमाण वाढत आहे. यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आजपर्यंत कधीच तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात केली नाही. आरोग्यासाठी तडजोड न करणाऱ्या जगप्रसिद्ध अशा व्यक्तींनी सदिच्छादूत म्हणून शासनाच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. यामुळे येणारी पिढी व्यसनाचे दुष्परिणाम ओळखून, समजावून घेऊन स्वच्छ मुख ठेवण्यासाठी सावधगिरी बाळगेल”, असे त्यांनी सांगितले.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणाले, “भारत हा तरुणांचा देश आहे, पण किती तरुण निरोगी जीवन जगतात हे महत्त्वाचे आहे. जीवन जगताना तंदुरुस्त दिसणे आणि निरोगी असणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निरोगी जीवन जगणे प्रत्येकाच्या हातात आहे. यासाठी मी जनजागृती करणार आहे. स्वतःचे मुख स्वच्छ ठेवा आरोग्यदायी जीवन जगा, आयुष्याची मॅच जिंकणे स्वतःच्या हातात आहे. राज्य शासनाने स्वच्छ मुख्य अभियान सुरू करून जनजागृतीच्या पहिल्या इनिंगला सुरुवात केली आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे श्री. तेंडुलकर यांनी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, “सचिन तेंडुलकर आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी आज सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम झाला. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल”, असा विश्वासही मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान’ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्यावतीने हे अभियान जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्याप्रमाणात अभियान राबवले जाणार असल्याचेही श्री. महाजन यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अश्विनी जोशी यांनी केले. आभार आयुक्त राजीव निवतकर यांनी मानले.

00000

विसंअ/राजू धोत्रे/ससं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed