सद्या तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे लेंडेगाव येथील दहा ते बारा शाळकरी मुले गावापासून जवळच असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले. ते थंडगार पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना त्यापैकी एकाला तलावाच्या भिंतीजवळ मानवी कवटी दिसून आली. इतरत्र नजर टाकल्यास त्यांना मानवी सांगाडा दिसला. तसेच कपड्यांमध्ये काही मानवी सांगाड्याचे अवशेष दिसून आले.
तिथे बाजूलाच हातातील एक कडेही आढळून आले. ही माहिती एकाने सोबत आलेल्या इतर मुलांना दिली. सगळ्यांनी तो विखुरलेला सांगाडा पहिला अन् तेथून गावात धूम ठोकली. गावात पोहचताच ग्रामस्थांना ही माहिती दिली. ही माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती समजेल तो पाझर तलावाकडे जाऊ लागला.
दरम्यान, गावातील अंबिकाबाई बाजगिरे यांनाही ही माहिती मिळाली. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यासुद्धा पाझर तलावाकडे गेल्या. मात्र तिथे पोहचल्यावर त्यांना धक्का बसला. चार महिन्यापासून बेपत्ता असणाऱ्या त्यांच्या मुलाच्या अंगावर जसे कपडे होते तसेच या कपडे या सांगाड्यावर कपडे असल्याने त्यांनी हंबरडा फोडला. संजय निवृत्ती बाजगिरे असे बेपत्ता असलेल्या ३८ वर्षीय तरुणाचे नाव असून आई वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे.
या सर्व घटनेची माहिती किनगाव पोलिसांना समजताच पोलीस उप निरीक्षक भाऊसाहेब खंदारे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान वैद्यकीय अधिकारीही घटनास्थळी पोहचले. त्यांनी सांगड्याचे डीएनए नमुने घेतले. आता त्याचा अहवाल आल्यानंतर अधिक खुलासा होईल. या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब खंदारे अधिक तपास करीत आहेत.