फडणवीस म्हणाले, ‘सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या राहुल गांधी यांना सावरकरांनी अंदमानात सोसलेल्या यातनांची कल्पना येणार नाही. एकाच तुरुंगात दोन्ही भाऊ होते; पण कित्येक दिवस भेट व्हायची नाही. खरेतर या कादंबरीसाठी मी राहुल गांधी यांचे आभार मानावेत, की लेखिका शुभांगी भडभडे यांचे, हा प्रश्न माझ्यासमोर आहे. सावरकरांनी भारताचे आत्मतेज जागृत केले. क्रांतिकारक म्हणून ते आपल्याला आकृष्ट करीत असले, तरी संस्कृतीला आव्हान देऊन त्यातील चांगले घेऊन पुढे नेणारे ते समाजसुधारक आहेत. विज्ञाननिष्ठ असलेल्या सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवीन शब्द देऊन समृद्ध केले आहे.’
‘शंकरनगर चौकातील सावरकरांचा पुतळा उभारण्याचा सोहळा मैदानावर घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्या वेळी गंगाधरराव फडणवीस आणि दत्ता मेघे यांच्या सहकार्याने तो कार्यक्रम होऊ शकला,’ अशी आठवण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. वि. स. जोग यांनी सांगितली. ‘सावरकरांनी देशभक्ती हा दहावा रस साहित्यक्षेत्राला दिला,’ असे आशुतोष अडोणी म्हणाले. ‘सावरकर नसते तर आजचा हिंदुस्थान नसता’, अशी भावना अनिल शेंडे यांनी व्यक्त केली. ‘संसदेत मी माफीवीर सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणाल्याच्या घटनेतून या कादंबरीचा जन्म झाला,’ असे लेखिका म्हणून मनोगत व्यक्त करताना भडभडे म्हणाल्या. सूत्रसंचालन प्रभा देऊस्कर यांनी केले.
नागपूरकरांना अर्थ ठाऊक!
‘राहुल गांधी यांची सावरकर होण्याची औकात नाही, असे म्हटल्यावर ‘औकात’ या शब्दाचा महाराष्ट्रात वेगवेगळा अर्थ घेण्यात येतो; पण नागपूरकरांना औकात या शब्दाचा अर्थ ठाऊक आहे. औकात म्हणजे क्षमता,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘आंबेडकर, स्वातंत्र्यवीरांना काँग्रेसने स्वीकारले नाही’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसने कधीही स्वीकारले नाही. पुढील वर्षी सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ पदवी प्रदान केल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, आजही त्यांना प्रश्नांकित चौकटीत उभे करण्यात येते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.