पावसाच्या तोंडावर दरवर्षी समुद्र प्रवाह वेग घेतो. समुद्राच्या पाण्याचा बदललेला प्रचंड वेग यामुळे किल्ल्यावर पोहोचणे अशक्य व धोकादायक होते. पावसाळा जवळ आला की लाटांचा प्रवाहाचा वेग वाढतो त्यामुळे शिडाच्या बोटी हेलकावे घेतात. त्यामुळेच प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून दरवर्षी पावसाळ्यात हा किल्ला पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंद ठेवण्यात येतो.
ऐतिहासिक महत्व असलेला हा जलदुर्ग जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मुंबई पुणे आदि ठिकाणाहून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या किल्ल्यावर जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता अथवा पुलाचा प्रस्तावही मेरीटाईम बोर्डाकडून पाच ते सात वर्षांपूर्वी देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव पुरातत्व खात्याकडून नाकारण्यात आला. या ठिकाणी जाण्यास रस्ता उपलब्ध झाल्यास जलदुर्गाचे महत्व राहणार नाही. ही ऐतिहासिक वास्तू आहे त्यामुळे रस्त्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला.
मुरुड तालुक्यातील राजपुरी व दिघी बंदरावरून हा किल्ला पाहण्यासाठी जाता येते. पावसाळ्याच्या दिवसात समुद्रातील बदललेल्या पाण्याच्या प्रवाहाने प्रवेशद्वाराजवळ पोहोचणे कठीण होऊन जाते. आजही सुट्टी असल्याने मोठी गर्दी झाली होती. पण पर्यटकांनी शिडाच्या बोटींमधून किल्ल्यास प्रदक्षिणा घालून किल्ल्याचे रूप बाहेरून पाहण्यात समाधान मानले.