• Sun. Sep 22nd, 2024

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 26, 2023
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

सातारा दि. 26: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालखी सोहळा विषयी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निरा स्नानावेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पालखी सोहळ्यात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी नदीमध्ये पुरेसा पाणीसाठा राहील याची दक्षता घ्यावी. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी टँकरची व्यवस्था करावी. तात्पुरत्या शौचालयांची पुरेशी उपलब्धता करुन द्यावी.  तसेच मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत दिव्यांची चांगली व्यवस्था करावी. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मनुष्यबळ तैनात ठेवावे. आरोग्य यंत्रणेने पुरेशा डॉक्टरांची व्यवस्था ठेऊन अत्यावश्यक औषधांचा पुरसा साठा  ठेवावा. दर 2 किमी अंतरावर रुग्णवाहिकांची व्यवस्था ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्गावरील धोकादायक कठडे, पूल या ठिकाणी फलक लावावे व बॅरिकेटींग करावे.  खड्डे बुजवावेत, रस्त्यांची कामे सुरु असलेल्या ठिकाणी असणाऱ्या धोकादायक खड्डयांच्या ठिकाणीही बॅरिकेटींग करावे. पोलीसांनी दरवर्षीप्रमाणे बंदोबस्ताचे नियोजन ठेवावे व वाहतूक व्यवस्था नियोजनाप्रमाणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी प्रशासनाच्या तयारीचा आढवा देताना सांगितले की, निरा स्नानाच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारणे काम पुर्ण झाले आहे. स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण करण्यात येत आहेत. पालखी तळाच्या ठिकाणी दर्शन रांगेसाठी बॅरेकेटींग करण्यात येणार आहे, मदत व नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असल्याचे सांगितले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी जिल्हा परिषदेकडील तयारीचा आढावा देताना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 1 हजार तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार आहेत, पुरेशा टँकरची व्यवस्थाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

            पोलीस अधिक्षक श्री. शेख यांनी बंदोबस्ताचा आढावा देताना, 970 पोलीस अंमलदार व 185 वाहतूक अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. या बरोबरच राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी, 25 पोलीस जीप, 35 वॉकीटॉकी सेट यासह फायरब्रिगेड, राहुट्या व लागणारे सर्व साहित्य पुरविण्यात येत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed