काजवा हा कणा नसलेला म्हणजेच अपृष्ठवंशीय गटातील कीटक. काजवे निशाचर असल्याने रात्रीच सक्रिय होतात. नर काजव्यांच्या पाठीवर दिव्यांप्रमाणे लुकलुकणारा प्रकाश बघायला मिळतो. जैविक कचरा विघटन, परागीभवनामध्ये काजव्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
काजवे चमकतात कसे?
काजव्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेतून प्रकाश निर्माण होतो. हा प्रकास जैविक प्रकारचा असतो. काजव्यांच्या पोटात मॅग्नेशियम, प्राणवायू, लुसिफेरस आणि लुसिफेरीन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाश निर्मिती होते.
दमट वातावरण पोषक
पावसाळ्यापूर्वीचे म्हणजेच मे महिन्यांच्या दुसऱ्या पंधरावड्यापासून अनुभवायला मिळणारे दमट वातावरण काजव्यांच्या मिलनासाठी पोषक असते. या महिनाभराच्या कालावधीत प्रामुख्याने वातावरण दमट होते, ढग दाटून आलेले असतात. याच दिवसांमध्ये पश्चिम घाटातील रानावनात, जंगलात काजव्यांचे मिलन होते. रात्री काजव्यांच्या पोटातून लुकलुकणाऱ्या प्रकाशात झाडांच्या फांद्या उजळतात. लयबद्ध पद्धतीने लुकलुकणारे काजवे या काळात दिसतात. मिलनानंतर काही दिवसातच मादी पाणथळ जागेत अंडी घालते आणि पुढील पिढी जन्माला येते.
काजव्यांचा अधिवास धोक्यात
मुख्यतः हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच त्यांचा मुक्काम असतो; पण गेल्या काही वर्षांत वृक्षतोड आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे काजव्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.
काजवा महोत्सवाची ठिकाणे
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा काजव महोत्सव दर वर्षी भंडारदरा भागात आयोजित केला जातो. वेगवेगळ्या भागांतून पर्यटक, निसर्गप्रेमी महोत्सवात सहभागी होतात. भंदारदरा, पांजरे, उडदावणे, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात, रंधा धबधब्याजवळ, भीमाशंकरचा काही भाग, ताम्हिणी अभयारण्य, पौड-मुळशी लोणावळ्यातील राजमाची वनक्षेत्रात काजवा महोत्सव आयोजित केले जातात. यंदाही गेल्या आठवड्यापासून काजवा महोत्सव सुरू झाले असून, ते १५ जूनपर्यंत ते सुरू राहतील.
पर्यटकांचा उपद्रव वाढता
काजवांच्या आकर्षणामुळे दर वर्षी महोत्सवातील पर्यटकांची गर्दी वाढते आहे. काजव्यांना बघण्यासाठी लोक जंगलात गाड्या घेऊन जातात. काजव्यांनी बहरलेल्या झाडांवर गाडीचे दिवे, बॅटरीचे झोत टाकतात. चांगले फोटो मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. झाडांखाली गोंधळ करतात. गोंधळ, अनाठायी धडपडीमुळे कावजांना त्रास होतो. अलीकडे महोत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दारूपार्ट्याही सुरू झाल्या आहेत. स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमींनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महोत्सवातील गर्दीवर, पर्यटकांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागातर्फे प्रयत्न सुरू झाले आहेत. महोत्सवादरम्याने कसे वागावे याचीही नियमावली करण्यात आली आहे.