छत्रपती संभाजीनगर शहरातील सुलतानपूर शिवारात राहणारे किशोर वेताळ यांनी काही दिवसांपूर्वी एक लाख रुपये खर्च करून दोन एकरामध्ये कांदा पीक घेतलं. कांद्याची लागवड केल्यानंतर अवकाळी पावसाने झोडपलं आणि यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं. या संकटातून सावरून आता काही दिवसांपूर्वी किशोर वेताळ यांनी कांद्याचे काढणी केली. यासाठी मजुरांना त्यांनी पुन्हा वीस हजार रुपये खर्च केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर किमान लावलेले पैसा तरी निघावे या आशेने किशोर वेताळ यांनी मजूर लावून कांद्याची काढणी केली. मात्र काढलेला कांदा बाजारामध्ये फक्त तीन रुपये किलोने मागणी केली जाऊ लागला. यामुळे संतापलेल्या किशोर वेताळ यांनी ३०० क्विंटल कांद्यावरती जेसीबी फिरवला.
कांद्यातून साधी मजुरीही निघत नाही. यामुळे शेतात असलेल्या कांद्यावरती जेसीबी फिरवण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसान झालेले शेतकरी किशोर वेताळ यांनी केली आहे.
शेतामध्ये शेतकरी राबराब राबतो. यामध्ये किमान थोडेफार उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते. मात्र वारंवार ऋतुचक्रात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने नुकसान भरपाई करून द्यावी, अशी आमची मागणी असल्याचं प्रशांत दनावरकर म्हणाले.