आढळून आलेल्या पाऊलखुणा (पायाचे ठसे) याच वाघाच्या असल्याचे तपासणीत समोर आले होते. त्यानंतर १५ मार्च २०२१ दरम्यान ट्रॅप कॅमेऱ्यातही वाघ कैद झाला तसेच त्याची विष्ठाही आढळून आली होती. वाघ आल्याने गौताळ्याच्या वैभवात भर पडल्याने सतर्क झालेल्या वन्यजीव विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना हाती घेतल्या. वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी मोहन नाईकवाडी, सहायक वनाधिकारी डॉ. आर. पी. नाळे व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत या वाघाच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जात आहे.
वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाघ विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातील आहे. विदर्भातून तो तेलंगणमध्ये गेला तेथून परत नांदेड, किनवट, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य, अजिंठामार्गे तो २०२१ मध्ये गौताळ्यात दाखल झाल्याचे सांगितल्या जाते. मुबलक अन्नपाणी तसेच सुरक्षित अधिवास असल्याने तो येथे रमल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. नागद, कन्नड, पाटणदेवी, नदी परिसर, चाळीसगाव आदी वन क्षेत्रासह प्रादेशिक वन विभागाच्या क्षेत्रातही त्याने अनेकदा भ्रमंती केल्याचे समजते. हा वाघ गौताळ्यात आला त्यावेळी तो अंदाजे सव्वातीन ते साडेतीन वर्षे वयाचा असावा, असा अंदाज तत्कालीन वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. आता तो सुमारे साडेपाच वर्षांचा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी आला होता वाघ
गौताळ्यात साधारणपणे ५१ वर्षांपूर्वी वाघ आढळून आला होता. त्यानंतर आईपासून विभक्त झालेला एक अडीच वर्षाचा वाघ डिसेंबर २०१९ मध्ये अजिंठा वनक्षेत्रात आला होता. काही दिवस मुक्काम केल्यावर तो परतीच्या मार्गावर गेला होता. तो वाघही टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचे समोर आले होते.