सिंहगडाचा लिखित उपलब्ध इतिहास १४व्या शतकापर्यंत मागे जातो. इसामी नामक लेखकाने इ. स. १३५०मध्ये लिहिलेल्या फुतुहस्सलातीन किंवा शाहनामा ई-हिंद या फार्सी महाकाव्यात महंमद तुघलकाने इ. स. १३२८मध्ये कुंधीयाना (कोंढाणा) किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकल्याची माहिती आहे.
‘सातवाहन काळाच्या मागे या परिसरात मानवाचा वावर असावा, असे माझे गृहीतक होते. सिंहगडावरील देवटाक्याच्या आणि तान्हाजी कड्याच्या परिसरात; तसेच कोंढणपूर-रांझे गावच्या परिसरातील डोंगर रांगेत मला काही ठिकाणी खडकाच्या पृष्ठभागावर प्राचीन कालीन मानवाने कोरलेल्या काही आकृत्या मिळाल्या,’ असे डॉ. मते यांनी सांगितले.
‘सिंहगडावर कप मार्क, जॉइटेड कप, रफिंग लिंक्स, कप विथ टेल, जॉइटेड टेल्स, कप विथ लेडर अशा वर्गवारीतील आकृत्या आहेत. यावर चार वर्षांपासून संशोधन सुरू आहे. अशा आकृत्यांवर जगभरात अनेक ठिकाणी संशोधन झाले आहे. त्यानुसार यावर शिक्कामोर्तब झाले आहे,’ असे डेक्कन कॉलेज येथील संशोधक सचिन पाटील म्हणाले.
दख्खनच्या पठारावरील प्राचीन व्यापारी मार्गाच्या आसपासच्या बॅसाल्ट खडकावर दगडी हत्याराने अशा आकृत्या कोरण्यात आल्या आहेत. मनातील संकल्पना व्यक्त करण्यासाठी ही रेखाटने कोरलेली असावीत. हा कालखंड मध्याश्मयुगापासून सुरू होऊन महापाषाण युगापर्यंत जातो.- डॉ. पी. डी. साबळे, पुरातत्त्व विभाग प्रमुख, डेक्कन कॉलेज
पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग या प्रागैतिहासिक काळाच्या कोणत्या टप्प्यात ही शिल्पे कोरली गेली, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पाश्चात्य देशांतील संशोधनानुसार अशा आकृत्यांचा काळ प्रागैतिहासिक काळाचा अखेरच्या टप्पा म्हणजे नवाश्मयुग असू शकतो.- डॉ. नंदकिशोर मते, इतिहास संशोधक