गेल्यावेळी जी रँक हवी होती ती मिळाली नव्हती मला आयपीएस होण्याचे इच्छा आहे. यामुळे पुन्हा मी जिद्दीने अभ्यास केला आणि गेल्या वेळेस पेक्षा चांगल्या रॅकने मी पास झालो. आपल्या सभोवतालचा मित्र वर्ग आणि मार्गदर्शन चांगले असेल तर आपण यश पुन्हा संपादन करू शकतो. यश मिळवण्यासाठी हार्डवर्क आणि चिकाटी सोबतच स्मार्टवर्क देखील गरजेचे आहे. कोणत्या वेळेत काय करायला हवा हे समजणं महत्त्वाच आहे. आणि शिवाय आपल्या आयुष्यात दुसरा पर्याय म्हणजे प्लॅन बी ठेवणे ही गरजेचे असते.
आशिष पाटील
आशिष हा मूळचा खेडेगावातील वाढलेला मुलगा. त्याचे वडील अशोक बाळू पाटील हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. कडवे केंद्रातील वीरवाडी शाळेत प्राथमिक शाळेत त्याने मराठीतूनच शिक्षणाचे धडे घेतले. आशिषने इयत्ता चौथीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आणि आपल्या शिरपेचात पहिला मानाचा तुरा रोवला. यानंतर हायस्कूलमध्ये पूर्व माध्यमिकमध्ये सातवीत शिष्यवृत्ती परीक्षेतही राज्याच्या यादीत आपलं स्थान मिळवलं. तर बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय येथे २०१३ मध्ये दहावी शालांत परीक्षेत ९७ टक्के गुण प्राप्त केले. पुढे ‘एनटीएस’या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवले आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शासकीय महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विषयातून विशेष श्रेणीतून पदवी मिळवली. चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळूनही आशिषने स्पर्धा परिक्षेचा मार्ग निवडला आणि अभ्यासाला लागला.
२०२० ची नागरी सेवा प्राथमिक परीक्षा तो पास झाला. मात्र मुख्य परीक्षेत त्याला थोडक्यात अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने २०२१ च्या यूपीएससी परीक्षेत ५६३ रँक प्राप्त करत यश आले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी पदावर रूजू झाले. मात्र आणखीवरील पदावर जाण्यासाठी आणि आपल्या रँकमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि आज जाहीर केलेल्या यूपीएससीच्या निकालात आशिषने ४६३वी रँक प्राप्त केली.
विशेष म्हणजे आशिष यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले. मात्र त्यांनी परीक्षा देण्यासाठी इंग्रजी भाषा निवडली आणि सामोरे गेले. तेही एकदा नव्हे तर दोनदा. आणि यशाचा झेंडा रोवला. त्यांच्या यशामध्ये आई, वडील यांचा भक्कम पाठिंबा आणि प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा वाटा आहे.
सलग दुसऱ्यांदा आशिषने यश संपादन केल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. शाहूवाडी सारख्या दुर्गम भागातून त्यानं जे प्रयत्न करून यश मिळवलं आहे. याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. सलग दुसऱ्या वेळी यश मिळवण्यासाठी जे सातत्य लागतं ते त्याने टिकून ठेवलं. आताच्या नवीन रँकनुसार त्याला कोणतं पद मिळतं याची देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. आमच्या घरचं वातावरण मी शिक्षक असल्याने शैक्षणिक जरी असलं तरी दुर्गम भागात त्याने शिक्षण घेतले आणि जिद्दीने अभ्यास केला. याचा आम्हाला आनंद आहे.
– अशोक पाटील, आशिष यांचे वडील