• Sat. Sep 21st, 2024
हळव्या नाजुकाचं कठोर पाऊल; मी तुला दुखावले मला माफ कर, भावाला म्हणत घेतला कायमचा निरोप

दौंड, पुणे : भावाला भावनिक पत्र लिहून दौंड येथील एका १७ वर्षीय मुलीने भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. नाजुका शामराव ननवरे (वय, १७, रा. सरपंच वस्ती, भवानीनगर, दौंड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. सोमवारी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.या प्रकरणी पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार नाजुकाचा भाऊ हा पुण्यात कामाला आहे. सोमवारी संध्याकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास कामावरून दौंडला घरी परत येत असताना त्याला त्याच्या चुलत भावाचा फोन आला. बहीण नाजुका कुठे आहे? ननवरे नावाच्या मुलीने भीमा नदी पुलावरून नदीपात्रात उडी मारली आहे. तेव्हा तू चौकशी करून ये आणि मला कळव असे त्याने मुलीच्या भावाला सांगितले.

काही वेळानंतर नाजुकाचा भाऊ घटनास्थळी आला. त्याने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी आपली बहीण वापरत असलेली दुचाकी त्याला घटनास्थळी दिसून आली. घटनास्थळावर उपस्थित नातेवाईक आणि जमलेल्या लोकांनी मुलीचा नदीपात्रात शोध घेतला. यावेळी नाजुका त्यांना आढळून आली. तिला तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासलं आणि तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

दरम्यान, नाजुका हिने मृत्यूपूर्वी आपल्या भावासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली मिळून आली. ‘मी तुला दुखावलं आहे. मला माफ कर, तुला दुखावल्याने मला असं वाटतं की माझा जगून काहीच उपयोग नाही. तुझं मन मोठं आहे म्हणून तू माझ्यासाठी एवढं सगळं करतो. यासाठी मी तुझी आभारी आहे. मला तुझी प्रगती होताना बघायचंय. पण जाऊ दे. तू नेहमी स्वतःची काळजी घे’, असा शेवटचा निरोप आपल्या भावासाठी चिठ्ठीत लिहून बहिणीने जीवन प्रवास संपवला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed