• Sun. Sep 22nd, 2024
डोंबिवली-बदलापूर रोडवर होतेय शेती! डांबरी रस्त्यावर भेंडी, पालक, मेथीचे पीक घेण्यास सुरुवात

ठाणे : एमआयडीसी आणि शेतकरी यांच्यात रस्त्याच्या भूसंपादनाचा वाद असून त्यावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी डोंबिवली- बदलापूर मार्गावरील एक मार्गिका बंद केली आहे. रस्ता बंद करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जमीन कसण्याचा निर्णय घेत चक्क डांबराच्या रस्त्यावर माती टाकून भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली आहे. भेंडी, पालक, मेथी, आळू आणि इतर भाज्यांचा समावेश आहे.डोंबिवली-बदलापूर पाइपलाइन रोड या राज्य महामार्गासाठी वसार गावातील शेतकऱ्यांची जागा एमआयडीसीने १९७२ मध्ये संपादित केली होती. बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी पाण्याची पाइपलाइन आणि राज्य महामार्ग बांधण्यासाठी ही जागा एमआयडीसीने ताब्यात घेतली. मात्र कागदोपत्री नोंद करताना प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या जागेऐवजी रस्त्याच्या बाजूच्या जागेवर एमआयडीसीनं फेरफाराची नोंद केली. त्यामुळे ज्या जागेवर रस्ता आहे ती जागाही गेली आणि बाजूच्या जागेवर एमआयडीसीची नोंद असल्यामुळे त्या जागेवरही काहीच करता येत नाही, अशा दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले. या कागदोपत्री गोंधळाबाबत मागील ५० वर्षांपासून शेतकऱ्यांकडून एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र ही निव्वळ कागदी चूक सुधारण्यासाठी एमआयडीसीने मागील ५० वर्षांत स्वारस्य दाखवलं नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी केला आहे.

आम्हला जागेचा मोबदला तरी द्या आणि नाहीतर तोडगा काढा, अशी मागणी करत या राज्य महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे बॅनरही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला लावले होते. त्यानंतरही एमआयडीसीकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज वसार गावातील शेतकऱ्यांनी डोंबिवली-बदलापूर राज्य महामार्गाची एक मार्गिका बंद केली. यावर तोडगा काढण्यासाठी २० दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. याला आता दीड महिना उलटला तरी प्रशासन लक्ष देत नाहीए. अखेर शेतकऱ्यांनी रस्त्यावर भेंडी, पाकल, मेथी, आळू आणि इतर भाज्यांची शेती करायला घेतली आहे. दरम्यान याप्रकणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि आम्हला न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी अर्धा राज्य महामार्ग केला बंद! डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोडवरील वाहतुकीला फटका
काय आहे प्रकरण?

डोंबिवली बदलापूर पाइपलाईन रोडवरील बारवी धरण पाणीपुरवठा योजनेसाठी एमआयडीसीने शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन केले होते. वसार गावातील शेतकऱ्यांची जमीनही भूसंपादित केली. शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याची आगाऊ रक्कमही शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, एमआयडीसीने भूसंपादनासाठी मंजूर केलेली जमीन संपादित न करता दुसरी जमीन संपादित केल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी नरेश वायले यांनी केली आहे.

एमआयडीसीने भूसंपादित केलेली जमीन व शेतकऱ्यांची खासगी जमीन दोन्ही भूखंडावर एमआयडीसी आपला हक्क सांगत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खासगी जमिनीचा काहीच वापर करता येत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. खासगी जागेवर व्यवसाय करण्यासाठी एमआयडीसी अधिकारी निधी मागत असल्याचा आरोप वायले यांनी केला होता.

पाणी द्या…अन्यथा विष पिऊ द्या; श्रीमंत ग्रामपंचायत ख्याती असलेल्या गावाने दिला शेवटचा पर्याय
भूसंपादन झालेली जमीन एमआयडीसीला देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र खासगी जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. या मागणीकडे एमआयडीसी अधिकारी लक्ष देत नाहीत. याविषयी शेतकरी शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. अंबरनाथ येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयानेही एमआयडीसीला पत्रव्यवहार केला आहे. एमआयडीसी पाइपलाइन आणि रस्त्याची वहिवाट यातील भूसंपादन नोंदणी नकाशात तफावत असल्याचे आढळून आल्याचा अहवाल दिला आहे. तशी मोजणी नकाशाची प्रत देखील एमआयडीसी कार्यालयास भूमि अभिलेखाकडून देण्यात आली आहे. वायले यांच्याप्रमाणेच येथील आणखी शेतऱ्यांच्याही खासगी जमिनीवर एमआयडीसीने अतिक्रमण केले आहे. एमआयडीसी अधिकारी याकडे गांर्भियाने लक्ष देत नसल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी करतात.

गेली अनेक वर्षे शेतकरी यासाठी लढा देत आहेत. मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पावसाळ्यात या महामार्गाची दुरावस्था झाल्याने पावसाळ्यानंतर एमआयडीसीने या रस्त्याची डागडुजी काम हाती घेतले होते. वसार गावाच्या हद्दीत मात्र रस्त्याची डागडुजी करण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्याने या भागातील रस्त्यााची दुरावस्था कायम आहे. आधी आमच्या जमिनीचा प्रश्न सोडवा नंतर महामार्गावरील खड्डे बुजवावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली होती.

वादाचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना…

महामार्गावरील एक मार्गिका ही बंद असल्याने दुसऱ्या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे, कल्याण दिशेकडून येणाऱ्या वाहनांना अंबरनाथ, बदलापूर जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागतो. बदलापूर एमआयडीसीकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या मार्गावर जड अवजड वाहनांची वर्दळ असते. वसार गावाजवळ अरुंद मार्गावरून वाहतूक सुरू आहे. ट्रक, कंटेनर, टॅंकर अशी मोठी वाहने आल्यास कोंडी होत आहे. ३० मीटरचा रस्ता हा बंद करण्यात आला आहे. त्यापुढे नेवाळी नाका मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेताना ही मोठी वाहने अडकत आहेत. त्यामुळे या वाहनांच्या पाठी इतर वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. दुचाकीस्वार जागा मिळेल तसे या ठिकाणाहून मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्यामुळे या कोंडीत भर पडते. या वाहनांच्या कोंडीत रुग्णवाहिका अडकत असल्याने रुग्णांचेही हाल होत आहेत. यामुळे या समस्येवर लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा वाहन चालक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed