मात्र, आता महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक युक्ती शोधून काढली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून महामार्ग पोलिसांकडून ही युक्ती वापरली जात असून त्यामुळे ट्रॅफिक जॅमचा प्रश्न सुटताना दिसत आहे. वाहतूक कोंडीची समस्या ही मुख्यत: वीकेंडच्या काळात किंवा सलग सुट्ट्या लागून आल्यास उद्धवते. त्यावर उपाय म्हणून आता महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवार-शनिवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी खंडाळा बोगद्याजवळ १५ मिनिटांचा वाहतूक ब्लॉक घेतला. ब्लॉक घेऊन मुंबईकडे येणारी मार्गिका बंद करून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी द्रुतगती मार्गावरील सहा मार्गिका (लेन) खुल्या केल्या. त्यामुळे १५ मिनिटांत सुमारे १,५०० वाहनांना मोकळा मार्ग मिळाला. ही वाहने अवघ्या काही मिनिटांत निघून गेल्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला. गेल्या शनिवारी खालापूर टोलनाक्यापासून काही अंतरावर खंडाळा बोगद्याजवळ १५ मिनिटांचे पाच ब्लॉक घेण्यात आले होते.
ही उपाययोजना राबवण्यासाठी प्रथम द्रुतगती मार्गाची ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली. त्यानंतर खंडाळा घाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर १५ मिनिटांचा ब्लॉक घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी रस्ता मोकळा करण्यात आला होता. हा ब्लॉक घेण्यासाठी ३०० लोखंडी बॅरिकेड्सची आवश्यकता भासते. हे बॅरिकेड्स पुरवण्याची मागणी ‘एमएसआरडीसी’ने केली आहे.
मिसिंग लिंकमुळं पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडी कमी होणार
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वीकेंड आणि सुट्टीच्या काळात वाहतूक कोंडी होताना दिसते. एक्स्प्रेस-वेवरील घाटातला टप्पा पार करण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. आठ किमीचे दोन बोगदे आणि मोठा दरी पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये एक्स्प्रेस-वेवर खालापूरच्या पुढे १.६ किलोमीटरचा आणि लोणावळ्याच्या दिशेने ८.९ किलोमीटर लांबीच्या दोन बोगद्यांचा समावेश आहे. खोपोलीपासून ते लोणावळ्यापर्यंतच्या घाटाचे अंतर २२ किलोमीटरचे आहे. घाटातील गर्दी टाळण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ तयार केली जात आहे. त्यामुळे आठ ते १० किलोमीटरचे अंतर आणि ४५ मिनिटांचा कालावधी वाचणार आहे.