• Mon. Nov 25th, 2024

    ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळणार ओळखपत्र

    ByMH LIVE NEWS

    May 21, 2023
    ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळणार ओळखपत्र

    राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ऊसतोडणी  कामगारांना ओळखपत्र देण्याची योजना राबविण्यात येते.

    ऊसतोडणी कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजूरी व अन्य लाभ देण्यात येत असले तरीही ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह उपदान इ. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळत नाहीत. सदर लाभ मिळण्यासाठी ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र देण्यात येत आहे.

    सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील ३ वर्षांपासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गट विकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व्हे करून त्यांना ऊसतोड कामगार असलेचे ओळखपत्र देणेत येत आहे.

    ओळखपत्र दिल्यानंतर पुढीलप्रमाणे लाभ मिळणार

    ऊसतोड कामगार यांना एक देश एक रेशनकार्ड या योजनेची अंमलबजावणी करणे, ऊसतोड कामगारांकरिता आरोग्य शिबिर राबविणे, पाणी पुरवठा / स्वच्छता यांची सोय करणे, ऊसतोड कामगारांच्या मुलांना साखर शाळा सुरू करणे, ऊसतोड कामगारांचे ० ते ६ वयोगटातील बालकास सकस आहाराची / किंवा अंगणवाडी मध्ये प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देण्याची अंमलबजावणी करणे, ऊसतोड महिला कामगारांसाठी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करणे, ऊसतोड कामगारांच्या मृत्यूनंतर देण्यात येणारे उपदान.

    वरील लाभ मिळण्यासाठी ऊसतोड कामगारांचेकडे ओळखपत्र असणे अपेक्षित आहे. तरी सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगारांनी सद्या वास्तव्यास असेलेल्या ठिकाणच्या ग्रामसेवकांशी संपर्क करून आपली नाव नोंदणी करावी असे आहवान  सहायक आयुक्त, समाज कल्याण  नितीन उबाळे यांनी केले आहे.

    ०००

    संकलन, सातारा जिल्हा माहिती कार्यालय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *