• Mon. Nov 25th, 2024

    “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत भाट्ये समुद्रकिनारा झाला चकचकीत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 21, 2023
    “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत भाट्ये समुद्रकिनारा झाला चकचकीत – महासंवाद

    रत्नागिरी,दि. २१ (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत विविध शासकीय विभागांचे अधिकारी -कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्या सहभागातून व सामूहिक श्रमदानाने भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छ व चकचकीत करण्यात आला.

    यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नवी दिल्लीचे उपसचिव श्री.शंकर लाल बैरवा, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी श्री. राम आदी उपस्थित होते.

    उपसचिव श्री.शंकर लाल बैरवा म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीमेचे जिल्हा प्रशासनाने उत्तम आयोजन केले असून येथील जनताही स्वच्छतेविषयी जागरूक असल्याचे दिसून आले. श्री.बैरवा यांनी भाट्ये समुद्रकिनाऱ्याची प्रशंसा करताना याची तुलना कॅलिफोर्नियातील समुद्रकिनाऱ्यांशी केली. या मोहिमेत जिल्हा प्रशासनातील सहभागी अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांचा उत्साह अतिशय कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

    जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले. त्यांनी “परिसर स्वच्छता” याविषयी आपल्या भारतीय संविधानातही मार्गदर्शकपर उल्लेख असल्याचे आवर्जून सांगितले. परिसर स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून आपण अतिशय लहान गोष्टीबाबत स्वच्छतेसाठी अतिशय जागरूक राहायला हवे. आपल्या जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनारे स्वच्छ असल्याचा अभिमान आहे,असे सांगून जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी अत्यंत कमीत कमी वेळेत या मोहिमेची अतिशय उत्तम तयारी केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याधिकारी तुषार बाबर, फिनोलेक्स कंपनीचे श्री.सागर, मुकुल माधव फाऊंडेशन यांचे विशेष कौतुक केले.

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेबद्दलचे महत्त्व आणि त्याप्रति आपले कर्तव्य,जबाबदारी याविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले.

    या मोहिमेत विविध शासकीय निमशासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही उत्साहाने सहभाग नोंदविला.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *