• Mon. Nov 25th, 2024

    आता रत्नागिरीतही लुटता येणार ‘हाऊसबोट’चा आनंद; केरळचे आकर्षण असणाऱ्या पर्यटकांचा वाचणार वेळ अन् पैसाही

    आता रत्नागिरीतही लुटता येणार ‘हाऊसबोट’चा आनंद; केरळचे आकर्षण असणाऱ्या पर्यटकांचा वाचणार वेळ अन् पैसाही

    चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांमध्येही केरळच्या धर्तीवर हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद पर्यटकांना लवकरच लुटता येणार आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग साकारला जाणार आहे. यासाठीच एक गट केरळचा अभ्यास दौरा करणार आहे.कोकणातील जलपर्यटन हे पर्यटकांचे आकर्षण असते. मुंबई, रायगड तसेच दाभोळ येथे सुरू असलेल्या प्रवासी फेरीबोटींना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. रत्नागिरी तालुक्यातील कर्ला येथे खाडीच्या पाण्यामध्ये बोटिंग सुरू आहे. दोन किंवा चार कुटुंबे एकत्र येऊन या पर्यटन सफारीचा आनंद लुटतात. त्यासाठी कॅटमरानचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनीही खासगीरीत्या सुरू करण्यात आलेल्या या हाऊसबोटिंगचा आनंद घेतला.

    रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बॅकवॉटर आहेत. किनाऱ्यावर सभोवताली असलेली नारळ-पोफळीची झाडे व निसर्गसंपदेने हा परिसर नटलेला आहे. याच खाड्यांमध्ये केरळच्या धर्तीवर हाऊसबोट सुरू करता येईल का, याची चाचपणी पुजार यांनी केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कोट्यवधींचा निधी येतो. काही महिला बचतगटांना एकत्र आणून सुमारे ५० लाख रु. ते ७५ लाख रुपयांची हाऊसबोट बांधून जलपर्यटन सुरू करण्याचा मानस पुजार यांनी व्यक्त केला आहे. याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा करून त्याला कसे अर्थसाहाय्य मिळेल, याबाबत प्राथमिक चर्चाही झाली आहे. त्या अनुषंगाने १२ जणांचा गट तयार करून केरळचा अभ्यास दौरा करण्यात येणार आहे. यामध्ये बँकेचा प्रतिनिधी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, उद्योग विभाग अशा काही महत्त्वाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. केरळमध्ये हाऊसबोटिंगद्वारे पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार सेवेचा अभ्यास करण्यात येईल.

    कोकणात जात असाल तर ही बातमी वाचायलाच हवी, पर्यटकांना होतोय मनस्ताप, जाणून घ्या कारण
    बँकेच्या अर्थसाह्यासाठी प्रयत्न

    ‘हाऊसबोटसाठी बँकेचे अर्थसाह्य, उमेद योजना, प्रधानमंत्री स्वयंरोजगार योजना, उद्योग विभागाच्या काही योजनांचा आधार घेण्याचा प्रयत्न आहे. हाऊसबोट प्रकल्पामुळे महिला बचत गट अधिक सक्षम व्हावेत, असाही प्रयत्न आहे. याद्वारे कोकणातील पर्यटन उद्योगाला नव्याने चालना मिळेल’, अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed