सध्या बोगद्यातील आतील काम, फिनिशिंग टच देण्याचं काम सुरू आहे. या बोगद्यानंतर पुढे ब्रिज-II हा प्रकल्पाचा दुसरा आणि सर्वात आव्हानात्मक भाग होता. कोणताही रस्ता नसलेल्या वनक्षेत्रावर हा ब्रिज बांधायचा असल्याने ते अतिशय कठीण काम असल्याचं अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितलं. मुंबई – नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वेच्या पॅकेज-१४ मध्ये ७.७८ किमी लांबीचे ट्विन बोगदे, एक इंटरचेंज, एक टोल प्लाझा, मल्टीपल क्रॉस पॅसेज असणार आहेत.
इगतपुरी हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेलं क्षेत्र आहे आणि काही वर्षांपूर्वी इथे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे बोगद्याच्या ब्रिज-II च्या कामावर परिणाम झाला होता. घनदाट जंगल, डोंगराळ प्रदेश आणि मुसळधार पाऊस यामुळे अतिशय सावधगिरीने काम करावं लागतं.
इगतपुरीशिवाय ब्रिज II च्या कामासाठी आणखी एक अडथळा, समस्या होती. वारा आणि मुसळधार पाऊस असताना सह्याद्रीच्या खोऱ्यात ६० मीटर उंचावर काम करणं सोपं नसल्याचंही ते म्हणाले. या मार्गावर ३५ घाट आहेत. त्यामुळे हे काम अधिक कठीण होत होतं. मात्र काम करताना सुरक्षित उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या संपूर्ण परिस्थितीत प्रकल्प कालावधीत पूर्ण करण्यात आल्याचा आनंद असल्याचं दास यांनी सांगितलं.