मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील अनेक माजी मंत्री पुन्हा संधी न मिळाल्याने नाराज आहेत. अनेक जण आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत आहेत. राज्य मंत्रिमंडळात सध्या २० मंत्री आहेत. त्यात शिंदे आणि भाजप गटातील प्रत्येकी नऊ मंत्र्यांचा समावेश आहे.
दोन हजाराची नोट बंद, फडणवीस म्हणाले…
दोन हजाराची नोट बंद करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांना फटकारले. या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाविरोधात आरबीआय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यावरून फडणवीसांनी पलटवार केला.
‘या नोटा (दोन हजार ) तुम्ही ऑक्टोबरपर्यंत बदलू शकता. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा आहेत, ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. जर कोणी काळा पैसा जमा केला असेल तर तो नक्कीच अडचणीत येईल. कारण, इतक्या नोटा आल्या कुठून, हे त्यांना सांगावे लागेल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नोटाबंदीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्या विरोधावरून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला.