पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. एकेक विद्यार्थ्याकडून १० ते १५ लाख रुपये घेतले गेले. यामध्ये मोठं रॅकेट काम करीत आहे, असा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस भरतीची फेर परीक्षा घेण्यात यावी. अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.
आमदाराने काय काय केले आरोप?
७ मे रोजी जी पोलीस भरती झाली. यात एक फार मोठं रॅकेट सक्रिय आहे. काही जणांकडून १० ते १५ लाख रूपये घेऊन त्यांना परीक्षेत पास करण्याचं काम करण्यात आलं आहे. जालन्याचे काही विद्यार्थी मला भेटले. परीक्षेला बायोमॅट्रीक हे बंधनकारक असतं. पण त्यांनी काही ठराविक उमेदवारांचं घेतलं आणि इतरांना न घेताच सोडून दिलं. सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले होते. तेही बंद होते. परीक्षेवेळी प्रश्नपत्रिका दिली गेली आणि ते गायब झाले. परीक्षा पर्यवेक्षकाला तिथे बसावं लागतं. आणि तिथे बटन कॅमेरे, मायक्रोफोन अशा साधनांद्वारे बाहेरच्यांशी संपर्कसाधून प्रश्नांची उत्तरं लिहिली गेली. व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका लीक झाली आहे. म्हणजे कुठे ना कुठे या पोलीस भरतीमध्ये फार मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे.
पोलीस भरती आणि परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी ५ ते ७ वर्षांपासून मैदानावर घाम गाळून शारीरिक तयारी केली होती. रात्रं दिवस संगणकावर प्रश्न पत्रिका सोडवून पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी केली होती. त्या मुलांचे सर्व श्रम वाया गेले. या विद्यार्थ्यांची सर्व तपश्चर्या वाया गेल्याचेही गोरंट्याल म्हणाले.
पोलिसांनी किंवा ज्या संस्थेने ही परीक्षा घेतली असेल ते फ्रॉड लोक आहेत, असेही गोरंट्याल म्हणाले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. जालना शहर तसेच जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलांचे एक ते दीड गुणांमुळे नंबर गेला. या मुलांनी आता काय करावं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अग्निवीर भरतीबाबतही गोरंट्याल यांनी आरोप केले. सरकार नेमके काय करतेय तेच कळत नाही. हे भाजपचे सरकार आहे. मनानिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी गोरंट्याल यांनी केली आहे. आपण स्वतः सोमवारी उपोषणाला बसणार असून झालेली परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी म्हटले.
हे सर्व मेरीटचे विद्यार्थी असून त्यांना न्याय मिळायला पाहिजे. या भरती संदर्भात कुठल्या प्रकारचा समन्वय नाही आणि काय चाललं तेच कळत नाही. यामुळे या प्रकाराची चौकशी व्हायलाच पाहिजे. जी पोलीस यंत्रणा किंवा एजेंसी ही परीक्षा घेत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे? अशी मागणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली आहे.