• Tue. Nov 26th, 2024

    प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे – राधाकृष्ण विखे पाटील

    ByMH LIVE NEWS

    May 20, 2023
    प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे – राधाकृष्ण विखे पाटील

    छ. संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० (जिमाका) : सामान्य जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजनांची अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ देण्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनीधी, पदाधिकारी यांनी समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

    जिल्हा‍धिकारी कार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, शिरीष बोराळकर, संजय किनीकर तसेच विविध पदधिकारी उपस्थित होते.

    महसूल मंत्री म्हणाले की, शासकीय योजना सामन्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडण्यासाठी पदाधिकारी काम करत असतात. हे काम करत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करणे आवश्यक आहे. पदाधिकारी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास शासकीय योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहचतील.

    ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विविध योजनेचा लाभ पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.

    यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब तसेच शिरीष बोराळकर, संजय किनीकर आणि इतर पदधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या सूचनांची दखल घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed