काजलला कोणतेही प्रोटीनयुक्त खाद्य नसताना मिळेल ती भाकर खाऊन, मिळेल ते अन्न खाऊन तिने आज हे यश प्राप्त केले. गावातील तरुण आणि ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण अकॅडमीतून सुटल्यानंतर तिला घरी येण्यास रात्र व्हायची. तेव्हा कोणताही मामुर्डीकर गाडीवाला काजलला पाहिल्यानंतर गाडी थांबवून तिला घरी सुखरूप पोहोचवायचा. त्यामुळे काजलला ग्रामस्थांकडून पावलोपावली मदत झाली. काजलने अजून पुढे चांगले शिक्षण आणि प्रयत्न करून उच्चपदापर्यंत यशाची शिखरे पादाक्रांत करावी, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.
काजल अभ्यासामध्ये फार हुशार आणि जिद्दी असल्यामुळे तिला सर्वजण ‘काजू’ म्हणतात. मुलींनी जिद्द, कष्ट केल्यावर खरोखर मुली यशाचे शिखर गाठतात. काजलची घरची परिस्थिती गरीबची आहे. काजलचे वडील मुंबईत हमाली करतात. आणि आई दीपाली रोज मोलमजुरी करते. आईच्या मेहनतीवर त्यांच्या घराची चूल पेटते. काजलचे घर इतके साधे आहे की कधी बाजूची भिंत किंवा छप्पर कधी खाली येईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीतही काजलने जिद्द सोडली नाही. परिस्थितीशी दोन हात करत आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. मुलींची जिद्द असेल तर आई-वडिलांचे, थोरामोठ्यांचे आशीर्वाद कधीच कमी पडणार नाही, याचे साक्षात उदाहरण म्हणजे कुमारी काजल.
काजलला भाऊ नाही. आई दीपाली या काजल आणि सानिका या मुलींना आपला मुलगाच मानते. मागील वर्षी पावसाळ्यात अपघात होवून सानिका हिच्या अंगावर झाड पडले होते. तेव्हा मात्र काजलचे सर्व कुटुंब हादरले होते. परंतु त्यावेळी गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी आपापल्या कुवतीप्रमाणे आर्थिक मदत केली. त्यामुळे काजलचे कुटुंब आणि तिची बहीण आज उभी आहे. काजलच्या घरची परिस्थिती पाहून तिला घरकुल मंजूर करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी आपल्याला कुटुंबाला वेळोवेळी मोठे सहकार्य केल्याचे काजल वारंवार सांगते.