• Fri. Mar 13th, 2026

    शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- पालकमंत्री – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 19, 2023
    शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- पालकमंत्री – महासंवाद

    सातारा दि. 19 : शासन आपल्या दारी हे अभियान निरंतर चालणारे आहे. एक दिवस योजनांचा लाभ दिला आणि संपले असे नाही. तर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम यापुढेही सतत सुरू ठेवायचे आहे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासन आपल्या दारी अभियानाची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    ग्रामपातळीवर प्रत्यक्ष भेट देऊन जनतेशी संवाद साधण्याच्या सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेविका असे ग्रामपातळीवर काम करणारे आपले कर्मचारी आहेत. त्यांनी पंधरा दिवसातून एकदा गावातील कुटुंबांशी संवाद साधून त्यांना कोणत्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे याची तपासणी करावी. त्यासाठी कुटुंबाची संपूर्ण माहिती जमा करावी. त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांनी कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे, कोणत्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे हे तपासावे. ज्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे त्याचा अर्ज जागेवर भरून घ्यावा. तालुका स्तरीय अधिकारी जसे तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनीही महिन्यातून किमान एकदा गावामध्ये जाऊन संवाद साधावा व कोणत्या योजनांचा लाभ गावकऱ्यांना देता येतो. याविषयी पहाणी करावी. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना योजनांची माहिती द्यावी व पात्र लाभार्थ्यांची निवड करावी. जिल्हास्तरीय अधिकारी यांनीही महिना किंवा दोन महिन्यातून एकदा गावांमध्ये भेटी द्याव्यात. सर्वांनी जबाबदारीने कर्तव्य भावनेतून जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

    बैठकीच्या सुरुवातीस पाटणचे प्रांताधिकारी श्री.  गाढे यांनी पाटण येथील शासन आपल्या दारी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली. तसेच कशा प्रकारे लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना लाभ देण्यात आला याची सविस्तर माहिती सादर केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed