नागपूर दि १९ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना हक्काची घरे प्राप्त होण्यासाठी येत्या दोन महिन्यात पट्टे वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिल्या.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल उपविभागीय कार्यालयात आज नरखेड व काटोल तालुक्यातील उपविभागीय आढावा बैठक झाली. खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे,आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर,अनिल देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या घरकुल योजनाअंतर्गत राज्यात दहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी पूरक ठरणारे पट्टे वाटप काटोल आणि नरखेड तालुका प्रशासनाने येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे. या उद्दिष्ट्य पूर्तीच्या कार्यक्रमास स्वतः उपस्थित राहील. आजच्या आढावा बैठकीत सादरीकरण करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व योजना येत्या काळात वेगाने पूर्ण करा. पालकमंत्री म्हणून या कामातील अडचणी दूर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
सरासरीपेक्षा कमी पावसाची परिस्थिती लक्षात घेता. त्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पीक नियोजन आणि पेरण्यांच्या तारखांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ‘अटल भूजल योजना’ व जलयुक्त शिवार योजनेतील कामांना गती दिल्यास कमी पावसातही पिके जगवता येतील,असे त्यांनी सांगितले. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौर पॅनल लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीनीची गरज आहे. नापीक, पडीक जमिनीचा यासाठी उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती द्या, सौर पॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती झाल्यास दिवसाच्या ओलीतासाठी वीजेचा अतिरिक्त साठा निर्माण होईल, यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा लाविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तत्पूर्वी, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सादरीकरण केले.यात त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम, अतिवृष्टी नुकसान भरपाई, जलयुक्त शिवार,अमृत सरोवर, पीएमकिसान, जलजीवन अभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, माझी वसुंधरा अभियान, पांदन रस्ता, रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थ सहाय्यित योजना, गाव तिथे स्मशानभूमी, आपले सरकार सेवा केंद्र आदींची माहिती दिली.
आमदार सर्वश्री अनिल देशमुख, आशिष जायस्वाल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सूचना केल्या. आज बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि सादरीकरणात झालेली चर्चा पूर्णतः अंमलबजावणीत आली पाहिजे याबाबतचे निर्देशही त्यांनी बैठकीच्या शेवटी केले.
काटोल ,नरखेड आणि मोहाड नगरपरिषदेच्या विविध कामांचा आढावाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.
00000