जंगले हे विदर्भाचे वैभव आहे आणि या जंगलांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण मात्र धोकाग्रस्त असे अनेक प्राणी आढळतात. वाघापासून ते राज्यपशू असलेल्या शेकरूपर्यंत अनेक अनोख्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना विदर्भाच्या जंगलांनी संरक्षण आणि अधिवास पुरविला आहे.
वाघ, अस्वल, अजगर, शेकरू, खवले मांजर, रानकुत्रे यांच्यासारखे प्राणी, तणमोर, सारस आणि माळढोक त्याचप्रमाणे विविध फुलपाखरे आणि कीटक हे धोकाग्रस्त प्रजातींमध्ये मोडतात. विदर्भातील विविध जंगलांमध्ये यांचे अस्तित्व आढळून येते. या प्रजातींना विदर्भातील जंगलांमध्ये अधिवास मिळाला आहे.
वाघांच्या संवर्धनाकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. मात्र, इतर धोकाग्रस्त प्राण्यांच्या नशिबात असे विशेष लक्ष नाही. तस्करीमुळे ज्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असे खवल्या मांजरही विदर्भात ठिकठिकाणी आढळून येते. या धोकाग्रस्त प्राण्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात असले तरी शिकारीच्या घटना, अधिवास नष्ट होणे यामुळे या प्राण्यांच्या अस्तित्वावर येत्या काळात गदा येण्याची चिन्हे आहेत.
सारस हा संभाव्य संकटग्रस्त पक्षी असून तो केवळ प्रामुख्याने गोंदियामध्ये आढळून येतो. मात्र, त्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसत नाही. या पक्ष्याचे अस्तित्वही संकटात असल्याची स्थिती आहे.
गडचिरोलीत शेकरूचे संवर्धन
शेकरू हा खारीचा एक प्रकार असून तो महाराष्ट्राचा राज्यपशू आहे. त्यांच्या संवर्धनसाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा अभयारण्यात शेकरूंचे अस्तित्व आढळून आले आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती संपूर्णपणे नसली तरी काही प्रमाणात धोकाग्रस्त समजण्यात येते. तिच्या संवर्धनासाठीही गडचिरोली आणि इतर ठिकाणी प्रयत्न करण्यात येत आहे.
आययूसीएन करते घोषणा
पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या मात्र ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अशा प्रजातींना धोकाग्रस्त प्रजाती म्हणून ओळखले जाते. या प्रजातींचे संरक्षण न केल्यास त्या पृथ्वीतलावरून नाहीशा होण्याची भीती असते. इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्यावतीने (आययूसीएन) प्रजाती धोकाग्रस्त आहे किंवा नाही, याचा निर्णय घेण्यात येतो. या संस्थेनुसार, जगातील किमान ४० टक्के कीटक, प्राणी आणि वनस्पती यांना समूळ नष्ट होण्याचा धोका संभवतो.
फुलपाखरांच्या १४ प्रजातींना संरक्षण
विदर्भात फुलपाखरांच्याही विविध प्रजाती आढळून येतात. यासंदर्भात यापूर्वी अभ्यासही करण्यात आला आहे. त्यानुसार, ९० विविध कुळांशी संबंधित अशा फुलपाखरांच्या १६७ प्रजाती विदर्भात नोंदविण्यात आल्या आहेत. यांपैकी, १४ प्रजातींना विशेष स्थान देण्यात आले असून त्यांना भारतीय वन्यजीव कायदा अधिनियम, १९७२ नुसार संरक्षण देण्यात आले आहे.
गिधांडाबद्दल विदर्भात आशा
मेळघाट, पेंच, गडचिरोली या भागात गिधाडांचे अस्तित्व आहे. मेळघाटात आढळणारी आणि उंच कड्यांवर घरटी करणारी लांब मानेची गिधाडे आता संपुष्टात आली आहेत. पांढरी गिधाडे पेंच आणि गडचिरोलीमध्ये दिसून येतात. त्यापैकी, पेंच हे व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र असल्याने तेथे गिधाडांची संख्या दिसून येते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्यावतीने गिधाड प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या प्रकल्पातील गिधाडांच्या जोड्या या मेळघाटसह विदर्भातील इतर जंगलांमध्ये सोडण्यात याव्यात, असा आमचा प्रयत्न असल्याचे मानद वन्यजीवरक्षक आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.