• Mon. Nov 25th, 2024

    गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2023
    गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि.१७ : गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, २०२२ स्पर्धेतील राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

    श्री. महाजन म्हणाले, स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढ केली आहे. त्यानुसार पदक प्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिकाची रक्कम जाहीर केली आहे. खेळाडू व मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकासाठी एकूण रक्कम रू. २०३६.७० लक्ष प्राप्त झालेली आहे.

    राज्याचे क्रीडा धोरण अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्याची योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित असून त्याअंतर्गत दि. २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गुजरात या राज्यात संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (National games) महाराष्ट्र राज्याचे ३४ खेळप्रकारात ८०० खेळाडू, ‘व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, मार्गदर्शक इ. चमू सहभागी झाले होते असे त्यांनी सांगितले.

    या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी ३९ सुवर्णपदक, ३८ रौप्यपदक व ६३ कांस्यपदक अशी एकूण १४० पदके प्राप्त केली असून, पदक तालिकेत देशात दुसरा क्रमांक संपादन केला आहे. परंतू स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व राज्यांचा विचार करता महाराष्ट्र राज्य हे पदक तालिकेत प्रथम स्थानी आहे. सन २०१५ यावर्षी केरळ येथे झालेल्या ३५ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कास्य पदकासाठी अनुक्रमे रु. ५.०० लक्ष रु. ३.०० लक्ष व रु. १.५० लक्ष रोख पारितोषिक रक्कम देऊन गौरविण्यात आलेले होते. आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संपादन केलेले पदक व रोख पारितोषिके खालील प्रमाणे रक्कम देण्यात आहे.

    सुवर्ण पदक विजेता खेळाडू ७ लाख रुपये, मार्गदर्शक ५० हजार रुपये,

    रौप्य पदक विजेता खेळाडू ५ लाख रुपये, मार्गदर्शक ३० हजार रुपये,

    कांस्य पदक विजेता खेळाडू ३ लाख रूपये आणि मार्गदर्शक २० हजार रुपये… याप्रमाणे वाढीव रक्कम देण्यात आली आहे.

    पदकप्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली रोख पारितोषिकाची रक्कम सर्व संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यास  मान्यता दिली असून मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही संचालनालयास्तरावर प्राधान्याने सुरू असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

    ००००

    राजू धोत्रे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *