• Sat. Sep 21st, 2024
पोलिसाला हार्ट अटॅक, त्याने छातीवर दाब दिला अन् प्राण वाचवले, मनमाडमध्ये नेमकं काय घडलं?

मनमाड : ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने ते दुचाकीवरुन खाली पडले. काही क्षण तसेच ते पडून राहिले. दारु पिऊन पडला असेल म्हणून काही वेळ लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण एका व्यक्तीला संबंधित पोलिसाला हदयविकाराचा झटका आल्याचं कळालं आणि त्याने समयसुचकता दाखवून त्यांचे प्राण वाचवले, ही घटना आहे मनमाड शहरातील…नेमकी घटना काय?

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय मनमाड शहरातील नागरिकांना आला. नागेश दांडे नावाचे रेल्वे पोलीस दुचाकीवरून ड्युटीवर होते. त्यावेळी शहरातील मुख्य बाजार पेठेत त्यांच्या छातीत दुखू लागलं अन् काही क्षणांत ते दुचाकीवरून खाली पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कुणी व्हिडीओ काढत होतं तर कुणी दारू पिऊन पडल्याचं सांगत होतं.

तिथून भागवत झाल्टे हा तरुण जात असताना गर्दी पाहून नेमकं काय झालंय, असा कानोसा घेण्यासाठी तो थांबला. नंतर नागेश यांना अस्वस्थ पाहून भागवतच्या लक्षात आलं की त्यांना हार्ट अॅटॅक आलाय. भागवतने क्षणाचाही विलंब न लावता नागेश यांच्या छातीवर दोन्ही हातांनी तीन-चार वेळा दाब देऊन त्यांना तोंडाने श्वास घेण्यास भाग पाडले.

अशी कृती तीन चार वेळा केल्यानंतर पोलिस हवालदार नागेश शुद्धीवर आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता नागेश यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र भागवत झाल्टेने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे एका पोलिसाचे प्राण वाचले होते. भागवत हा एकप्रकारे नागेश यांच्यासाठी देवदूतच ठरल्याची चर्चा मनमाडच्या नाक्यानाक्यावर सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed