• Mon. Nov 25th, 2024
    तुम्हाला पैसे दिले ना? रुग्णवाहिकेतून चक्क व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; असा उधळला डाव

    सातारा : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तस्करीसाठी वापरली जाणारी व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून व्हेल माशाची ५ किलो वजनाची उलटी जप्त केली. सर्व संशयित आरोपी कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील असून, जप्त केलेला मुद्देमाल तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितलं.

    सिद्धार्थ विठ्ठल लाकडे (वय ३१, रा. कासारवेली, ता. जि. रत्नागिरी), नासीर अहमद रहिमान राऊत (४०, रा. भडकंबा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी), किरण गोविंद भाटकर (५०, रा. भाटिये, ता. जि. रत्नागिरी), अनिस इसा शेख (३८, रा. शिवाजीनगर, हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    Balasaheb Thorat : कोर्टात गेम फसला, मात्र काँग्रेस ठामपणे ठाकरेंच्या पाठिशी; थोरात म्हणाले, सत्य सर्वांनाच ठावूक!
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भाटकर हा रत्नागिरी पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. काही वर्षांपूर्वी त्याने पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र, पोलीस दलात काम करताना व्हेल माशाच्या उलटीची किंमत काय आहे? हे तो जाणून होता. रत्नागिरीतील सिद्धार्थ लाकडे याच्या ओळखीने हातकणंगलेतील मुंबईत राहणारा अनिस शेख हा व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीमध्ये काम करत असल्याची माहिती त्यांना समजली. त्यानुसार रत्नागिरीतून व्हेल माशाची उलटी या चौघांनी घेतली. त्याची डील मुंबईतील एका व्यक्तीसोबत ठरली, पण तिथपर्यंत उलटी न्यायची कशी? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

    कायदा राबविलेल्या पोलिसाचा अनुभव आणि तस्करी क्षेत्रात पाय घट्ट रोवून डील करणाऱ्या अनिस शेख याच्या डोक्यातून भन्नाट कल्पना समोर आली. जर रुग्णवाहिकेतून आपण मुंबईपर्यंत पोहोचलो तर आपले काम चोख होईल. त्यामुळे त्यांनी रत्नागिरीतीलच रुग्णवाहिका चालक नासिर राऊत याला “कऱ्हाडला पेशंट आणायचं आहे”, असं सांगून रुग्णवाहिका बुक करून तिघेही रुग्णवाहिकेत बसले.

    कऱ्हाडपर्यंत आल्यानंतर चालकाने त्यांना “आता कुठे जायचे आहे?”, असं विचारले असता “चला सांगतो, तुम्हाला भाडे दिले म्हणजे बास ना”, असं म्हणून त्याला पुण्याच्या दिशेने रुग्णवाहिका नेण्यास सांगितले. सातारा शहरालगत महामार्गावरून जात असलेल्या अॅम्ब्युलन्सबाबत (एमएच ०८ एपी २४४३ ) सातारा पोलिसांना संशय आला. त्यानुसार एलसीबी पथकाने ती रुग्णवाहिका थांबवून पाहणी केली असता, त्यात एका पिशवीत काळपट पिवळसर रंगाचा ओबडधोबड आकाराचा पदार्थ आढळला.

    उपस्थित वनाधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली असता तो पदार्थ व्हेल माशाच्या उलटीसदृश असल्याचे स्पष्ट झाले. कायद्याने तो पदार्थ बेकायदेशिररीत्या जवळ बाळगून वाहतूक करण्यास प्रतिबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी याबाबत रुग्णवाहिकेतील चौघांना विचारले असता ते निरुत्तर झाले. एलसीबी पथकाने चौघा संशयितांना ताब्यात घेऊन सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर वन्यप्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

    खरं पाहायला गेलं तर, रुग्णवाहिका कधीही अडवली जात नाही. त्यामुळे या तस्करांनी रुग्णवाहिका निवडली. पण साताराच्या एलसीबीचे स्ट्रॉंग नेटवर्क त्यांचे कट उद्ध्वस्त करण्यात कारणीभूत ठरले. अन्यथा संशयतांची पाच कोटींची डील यशस्वी झाली असती. रत्नागिरी पोलीस दलाच्या एलसीबीसारख्या शाखेत काम केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेऊन तस्कर बननं पसंत केलं. जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा सातराचं पोलीस दलही अवाक् झालं.

    ठाकरेंचा राजीनामा, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अन् भाजपला सणसणीत टोला, शरद पवार काय म्हणाले?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed