• Sat. Sep 21st, 2024

राज्यात यंदा पुरेसा कोळसासाठा; महानिर्मितीच्या प्रभावी इंधन व्यवस्थापनाचा परिणाम

राज्यात यंदा पुरेसा कोळसासाठा; महानिर्मितीच्या प्रभावी इंधन व्यवस्थापनाचा परिणाम

मुंबई : सर्वाधिक वीजमागणीच्या काळात, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात महानिर्मितीचा कोळसासाठा दोन दिवसांपुरताच असल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र, तो सरासरी १५ दिवसांवर गेला आहे. महानिर्मिती कंपनीने प्रभावी इंधन व्यवस्थापन हाती घेतले असून, त्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.मागील वर्षी उन्हाळ्यात ‘महावितरण’ची वीजमागणी सर्वाधिक असताना राज्य सरकारी महानिर्मितीकडे कोळसा टंचाई होती. परिणामी ‘महावितरण’ला बाहेरून महागड्या दराने वीजखरेदी करावी लागली होती. मागील वर्षीच्या उन्हाळ्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने प्रभावी इंधन व्यवस्थापनाचा अवलंब सुरू केला आहे. त्याअंतर्गत वाहतुकीदरम्यान होणारी कोळसाहानी रोखली जात आहे. त्याखेरीज केंद्रात आलेला कोळसा व्यवस्थित साठवून ठेवणे, कमी कोळशात अधिकाधिक वीजनिर्मिती करणे, कोल इंडियाकडून वेळेत चांगला कोळसा मिळावा यासाठी खाणींशी समन्वय वाढविणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच सध्या उन्हाळ्यात महानिर्मितीची वीजनिर्मिती सरासरी सात हजार मेगावॉट असली तरी कोळसासाठा पुरेसा आहे.

महानिर्मितीमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महानिर्मितीच्या सात निर्मिती संचांमध्ये मिळून सध्या १६ लाख टन कोळसासाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी हा साठा जेमतेम दोन लाख टनांच्या घरात होता. मोठ्या वीज प्रकल्पांमध्ये २० दिवसांहून अधिक पुरेल, इतका वीजसाठा आहे.’
लेहकडे जाणाऱ्यांत ‘गो फर्स्ट’ने भरविली धडकी; इतर कंपन्यांनी वाढविले तिकिटाचे दर
महत्त्वाच्या प्रकल्पांतील कोळशाची स्थिती याप्रमाणे

खापरखेडा : २४ दिवस
कोराडी : २० दिवस
नाशिक : ११ दिवस
चंद्रपूर : ९ दिवस
भुसावळ : ६ दिवस
वार्षिक ५६ दशलक्ष टनाचा करार

महानिर्मितीने कोल इंडियाशी वार्षिक ५६ दशलक्ष (५.६० कोटी) टन वीजखरेदीचा करार केला आहे. एक मेगावॉट वीजनिर्मितीसाठी सरासरी ४०० ते ५०० किलो कोळसा लागतो. महानिर्मितीची स्थापित औष्णिक वीज क्षमता नऊ हजार मेगावॉट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed