मणिपूरमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मदतीची याचना केली होती. या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस पाठवला होता. देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आश्र्वस्त केले आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तुम्ही कोणतीही काळजी करु नका, असा सल्ला फडणवीसांनी विद्यार्थ्यांना दिला.
याशिवाय, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालक यांना संपर्क केला. देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना तत्काळ, परिस्थिती पूर्वपदावर येईस्तोवर त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना येथे सुरक्षा मिळेल. शिवाय या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या वतीने तत्काळ केली जात आहे. महाराष्ट्र प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.
सांगलीतील विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा फोन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मणिपूरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. तत्पूर्वी शरद पवार यांनी मणिपूरमध्ये अडकून पडलेल्या सांगलीतील काही विद्यार्थ्यांची मदत केली. जत तालुक्यातील काही विद्यार्थी मणिपूर येथे शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे ही मुले त्याठिकाणी अडकून पडली. या मुलांनी आपल्या पालकांना फोन करुन मदतीसाठी याचना केली. आजुबाजुला गोळीबार आणि स्फोटाचे आवाज येत आहेत. कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल, काहीतरी करा, असे एका विद्यार्थ्याने पालकांना सांगितले होते. या मुलांच्या पालकांनी शरद पवार यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली होती. तेव्हा शरद पवार यांनी मणिपुरच्या राज्यपालांना फोन केला आणि महाराष्ट्रातील १० मुलांबरोबर दुसर्या राज्यातील त्यांच्या दोन मित्रांना सुरक्षितस्थळी हलवण्यास सांगितले. त्यानुसार लष्कराच्या जवानांनी या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून लष्कराच्या छावणीत हलवले.