मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एबीपी माझाला ‘महाकट्ट्या’च्या निमित्ताने आई मधुवंती यांच्यासह विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत लहानपणीचे किस्से, शाळेतले काही खास प्रसंग, कॉलेजमधील अवलीपणा, शर्मिला ठाकरे यांच्यासोबतीचा लग्नाचा किस्सा, पुढे पक्षस्थापनेचा प्रसंग, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतीचं नातं, उद्धव-राज यांच्यामधील धमाल गोष्टी ते आता मनसेसमोरची आव्हानं, आताची राजकीय स्थिती अशा अनेक गोष्टींवर राज यांनी खास शैलीत मतं व्यक्त केली. याच मुलाखतीत त्यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्याबरोबर घडलेला किस्सा सांगितला.
रतन टाटा यांच्यासोबत घडलेला किस्सा नेमका काय?
दिवंगत उद्योगपती जेआरडी टाटा परदेशात होते. त्याचवेळी इकडे भारतात त्यांच्या जवळच्या कुटुंबातील एका सदस्याचं निधन झालं. जेआरडी टाटा यांनी रतन टाटा यांना सांत्वनासाठी संबंधित कुटुंबाकडे जायला सांगितलं. वडील जेआरडी यांनी सांगितलं म्हटल्यावर तरुण वयात असलेल्या रतन टाटा यांना तत्काळ होकार कळवून, लागलीच निघतो म्हणून वडिलांना सांगितलं.
वडिलांनी सांगितल्याप्रमाणे रतन टाटा संबंधित व्यक्तीच्या घरी गेले. मोठ्या व्यक्तीचं निधन झालं असल्याने त्यांच्या बंगल्याबाहेर लोकांची खूप गर्दी होती. रतन टाटा त्या गर्दीतून वाट काढत घरात गेले. तिथे एका खुर्चीवर एक व्यक्ती बसली होती. रतन टाटा त्यांनी सांत्वनाच्या सुरात खूप वाईट झालं, असं व्हायला नको होतं… तुम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशा सुरात सांत्वन करुन ते घराबाहेर पडले.
घराबाहेर पडल्यावर रतन टाटा यांनी त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तीला विचारलं की- मी सांत्वन तर केलं पण मला ज्या व्यक्तीचं निधन झालं त्या व्यक्तीची डेडबॉडी कुठेच दिसली नाही… त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितलं, तुम्ही ज्याच्याशी बोललात तीच डेडबॉडी होती…. त्यांच्याकडे बॉडीच खुर्चीत बसवतात….!
राज ठाकरेंनी हा किस्सा सांगितल्यावर त्यांच्या आई मधुवंती, पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि मुलगी उर्वशी पोट धरुन हसले. राज ठाकरेंनाही किस्सा सांगून झाल्यावर हसू आवरता आलं नाही.