• Mon. Nov 25th, 2024

    स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

    ByMH LIVE NEWS

    May 4, 2023
    स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

    पुणे दि.४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

    पुणे महानगरपालिका येथे दक्षिण गोलार्धातील विविध देशांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत पुणे शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पुणे महानगरपालिका व कचरा वाचकांच्या स्वच्छ मॉडेल संदर्भातील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंटचे  प्रमुख अतुल विश्वास आदी उपस्थित होते.

    श्री.पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध चांगले उपक्रम राबविण्यात आले. पुणे शहरानेदेखील अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. येथील ‘स्वच्छ मॉडेल’ यशस्वी ठरले आहे. जगातील प्रतिनिधींनी या कार्याची दखल घेणे ही अभिमानाची गोष्ट आहे. शहराला भेट देण्यासाठी आलेले प्रतिनिधी हे आपापल्या देशातील महत्वाचे अधिकारी असून त्यांच्या देशातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ही भेट उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, देशात स्वच्छ भारत अभियानाला चांगले यश मिळाले आहे. या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येत आहेत. दक्षिण गोलार्धातील विविध देशांच्या प्रतिनिधींनी पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेचे कौतुक करणे ही शहरासाठी चांगली बाब असून शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचारी आणि नागरिकांना त्यातून प्रोत्साहन मिळेल.

    श्री.विश्वास म्हणाले, उत्तम नेतृतव आणि प्रशासकीय पातळीवरील तेवढेच चांगले प्रयत्न यामुहे स्वच्छ भारत अभियान यशस्वी ठरले आहे. पुण्यातील ‘स्वच्छ मॉडेल’ जगात वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. पाच दिवसाचा दौरा सर्व प्रतिनिधींसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    श्री.खेमनार यांनी प्रास्ताविकात विविध देशातील प्रतिनिधींच्या भेटीविषयी माहिती दिली. 19 देशांचे 38 प्रतिनिधी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी आले असून त्यात 15 अफ्रीकन देश आणि इतर अशियातील देशांचे प्रतिनिधी आहेत. सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंटने या भेटीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

    स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या संस्थापक  लक्ष्मी नारायण यांनी कचरा वेचकांच्या कामाची पद्धत, स्वच्छ व केकेपीकेपी संस्थेची स्थापना व कामकाज याविषयी माहिती दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed