प्रणवची आई दर्शना व वडील रमेश हे बागायती शेतीवर शेतमजूर म्हणून काम करतात. दर्शना मजुरी करून थकून घरी आल्यानंतर पाण्यासाठी त्यांना अर्धा किलोमीटर लांब जावे लागत होते. आईचे कष्ट बघवत नसल्याने प्रणवने विहीर खोदण्याचा निर्धार केला. घराच्या अंगणात त्याने पहारीने खड्डा खोदायला सुरुवात केली. दररोज थोडाथोडा खड्डा खोदून, सुमारे १२-१५ फूट खोल खड्डा केल्यानंतर त्याला गोड पाणी लागले.
खड्डा खोदण्यासाठी प्रणवने अथक परिश्रम घेतले. खड्ड्यातून माती काढण्यासाठी त्याने स्वतःहून शिडी बनवली व त्याद्वारे तो माती खणून वर आणून टाकत होता. खड्डा खोदताना दगडही लागले; मात्र वडिलांच्या सहकार्याने त्याने हे दगडही फोडले. खोदता खोदता अखेर पाणी लागले आणि त्याची मेहनत फळास आली.