• Mon. Nov 25th, 2024

    भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    ByMH LIVE NEWS

    May 3, 2023
    भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 3 : भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. आपल्या या शिक्षण पद्धतीबरोबरच जगातील दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षण पद्धती अथवा अभ्यासक्रमांचा अवश्य स्वीकार करावा, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितले. तसेच इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

    महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) नियामक मंडळाची २५१ वी सभा आज शालेय शिक्षण मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक तथा माध्यमिक शिक्षण संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धती पुरातन आहे. विद्यार्थ्यांना हसत – खेळत शिकवताना झालेला अभ्यास कायम लक्षात राहतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, बालभारतीची पुस्तके आणि त्यासाठी साठवायचा पेपर खराब होणार नाही याची दक्षता घेताना राज्यातील गोडाऊन सुस्थितीत ठेवावेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत. जगात ज्या चांगल्या शिक्षण पद्धती आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी जाणून घेता याव्यात याअनुषंगाने एक संग्रहालय तयार करावे, असे सांगून हे संग्रहालय संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    सर्व शाळा इंटरनेटशी जोडल्या जाणार आहेत. यासाठी दुर्गम भागातील ज्या शाळांमध्ये नेटवर्क नाही, त्यांची माहिती घेऊन त्या उपग्रहाद्वारे जोडण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात येणारी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देऊन लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर आवडीची पुस्तके देखील शाळेत उपलब्ध करून द्या, असेही त्यांनी सांगितले.

    00000

    बी.सी.झंवर/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed