• Sun. Sep 22nd, 2024

महिला बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराची सुविधा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

ByMH LIVE NEWS

May 3, 2023
महिला बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराची सुविधा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 3 : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनीषा कायंदे आणि अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, आज महिला बचत गट  उत्तम प्रकारे वस्तूंची निर्मिती करत आहेत. महिलांनी  तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे बचतगटांची मागणी लक्षात घेता स्थानिक ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच महापुरूष दादाभाई सहकारी गृहनिर्माण संस्था, परळ यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार स्थानिक प्रशासनाने विकासकाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. आज १४८९  तक्रारीपैकी दाखल झाल्या असून जागीच १५५ तक्रारींचे निराकरण  करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

सॅण्डहर्स्ट रोड येथील बी वॉर्ड येथे  रविवार दिनांक 7 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहेत. हा उपक्रम  ३१ मे २०२३ पर्यंत  सकाळी १० ते दुपारी ३ वाजता या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed