अजित पवार चिडले, भावनिक नेते कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले हा निर्णय कधी ना कधी होणारच होता
अजित पवार काय म्हणाले?
तुम्ही गैरसमज करुन घेताय की पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही असं नाहीये. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष खरगे, पण काँग्रेस चालतं सोनिया गांधींकडे बघून. त्यामुळे पवार साहेबांच्या आताच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि इतर सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहातोय, ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम करेल, शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत. त्यामुळे आता पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे, लोकशाहीत पवार साहेब जनतेचं ऐकत असतात हे मी इतके वर्ष बघत आलो आहे.
साहेब आपल्याला वेळावेळी मार्गदर्शन करतील, तुम्ही असं का मनात आणता की साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्यांकांच्या पाठीशी उभे राहातील आणि अध्यक्ष नसतील तर उभे राहणार नाहीत. ते साहेबांच्या रक्तात नाही, ते अध्यक्ष असले नसले तरी हा आपला परिवार असाच पुढे चालत राहणार आहे. भावनिक होऊ नका, पवार साहेबांनी परवाच सांगितलं भाकरी फिरवावी लागते, तसा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मला काकींनीही सांगितलं की ते निर्णय मागे घेणार नाहीत.
हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता – अजित पवार
साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणार आहे, आपण सर्व त्या अध्यक्षाला साथ देऊ, आपण त्याच्या पाठीशी उभं राहू. कोणीही अध्यक्ष झालं तरी ते साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालणार आहे, जे सांगायला नको. काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नकोय, हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. कालच हा निर्णय जाहीर करणार होते पण काल वज्रमूठ सभा होती. म्हणून आज त्यांनी हा निर्णय जाहीर केला.